घरमहाराष्ट्रपुणेSushama Andhare : सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकरांना सुनावले...

Sushama Andhare : सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकरांना सुनावले खडेबोल

Subscribe

एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांच्या वैयक्तिक पातळीवर टीका केली. त्यांच्या या टीकेवर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरांना खडेबोल सुनावले आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासूनच कायमच या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आहेत. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शरद पवार गटावर जोरदार निशाणा साधला जात आहे. पण आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांच्या वैयक्तिक पातळीवर टीका केली. चाकणकरांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. (Sushma Andhare scolded Rupali Chakankar for her statement about Supriya Sule)

हेही वाचा… Jitendra Awhad : ही तर जिजाऊंची लेक, रुपाली चाकणकरांना जितेंद्र आव्हाडांनी सुनावले

- Advertisement -

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर या बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळेंचे नाव न घेता त्यांच्यावर खोचक टीका करत म्हणाल्या की, “लग्नानंतर मुलीने सासरी लुडबूड करायची नसते. तिचे एकदा लावून दिले की तिने सासरीच नांदायचे असते. माहेरी किती लुडबूड करावी यालाही मर्यादा असतात.” परंतु, त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चाकणकरांनी केलेल्या विधानामुळे अंधारे संतापल्या असून त्यांनी यासाठी चाकणकरांना खडेबोल सुनावले आहेत.

महिला म्हणून चाकणकरांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे. परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून काम करणाऱ्या एका व्यक्तीने केलेले वक्तव्य म्हणून चिंतनीय आहे, असे सुषमा अंधारे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. रुपाली चाकणकर यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत अद्यापही सुप्रिया सुळे यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु, अंधारे यांनी त्यांच्या फेसबुकवर याबाबतची एक पोस्ट लिहिली आहे. रुपाली चाकणकर या अशा पद्धतीची वक्तव्ये का करत आहेत, हे जाणून घेण्यात कोणताही रस नाही. परंतु, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करणे, चुकीचे असल्याचे मत मांडत सुषा अंधारे यांनी चाकणकरांवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच, राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या पदाची गरिमा आणि राज्यातील फुले शाहू आंबेडकरांचा वैचारिक वसा वारसा कळत असेल तर आपण आपले शब्द परत घ्याल अशी अपेक्षा आहे, पण ती अपेक्षा अर्थात फोल ठरेल, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी चाकणकरांना सुनावले आहे.

- Advertisement -

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची फेसबुक पोस्ट…

प्रति
रुपाली चाकणकर
श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेतलं आपलं भाषण ऐकण्याचा योग आला. आपण ज्या तावा- तावाने खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल बोललात. का बोललात ? कोणत्या लोभापोटी बोललात ? कोणत्या स्वार्थाने पछाडलेल्या आहात ? सुप्रिया सुळे किंवा पवार कुटुंबीयांनी आपल्यावर काय उपकार केले ? आपली एकूण किती पकड आहे आणि आपण किती जनमानसामध्ये उतरून काम करता यावर मला अजिबात टिप्पणी करण्यामध्ये रस नाही.
पण काल प्रचार सभेमध्ये बोलताना आपण, ” लेकीने माहेरी लुडबुड करू नये” अशा आशयाचे जे वक्तव्य केले हे महिला म्हणून तर अत्यंत निंदनीय आहे परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून काम करणाऱ्या एका व्यक्तीने केलेले वक्तव्य म्हणून चिंतनीय आहे.
रूपालीजी महिला आयोग म्हणून आपण जेव्हा कधी अधिकार वापरले ते फक्त आणि फक्त स्वतःवर कधी समाजमाध्यमांमधून टीका टिप्पणी झाली तर त्यासाठी म्हणून ते वापरले गेले. पण इतर महिलांवर कधी जर अभद्र टिप्पण्या झाल्या तर आपण कधीही स्वतःहून त्याची दखल घेतली नाही. कारण अशा काळात जेव्हा एखादी महिला सैरभैर होते अडखळते.. अडते.. नडते.. तेव्हा तिच्या पाठीशी ठामपणे उभं असतं ते तिचं कुटुंब.
सासर आणि माहेर दोन्हीकडचे लोक.
कित्येक कुटुंबांमध्ये आपल्या वृद्ध माता-पित्यांची काळजी त्यांची अपत्ये घेतात.
ज्यांना एकच अपत्य आहे आणि विशेषता ती मुलगी आहे अशा स्थितीमध्ये त्या वृद्ध माता पित्यांची काळजी कुणी बरे घ्यायला हवी?
सुप्रिया सुळे या आदरणीय पवारसाहेबांच्या एकमेव कन्या आहेत हे ज्ञात असेलच आपल्याला. विशेषता मुलगा असो की मुलगी असो, एकच अपत्य असायला हवे असे ठरवून सुप्रिया सुळे या एकुलत्या एक कन्या आहेत.
अशा परिस्थितीमध्ये आपल्या 84 वर्ष वयोवृद्ध पित्याला अनेक आजारांनी ग्रासलेलं असताना ज्यांच्यासाठी रक्ताचे पाणी केलं जीव झिजवला. ऊन वारा पावसाची झळ लागू नये म्हणून काळीज कप्प्यामध्ये जपलं. अशा आपल्याच म्हणणाऱ्यांनी विश्वासघाताचे सपासप वार करून त्या वृद्ध पित्याला त्याच्या असंख्य भावभावनांना रक्तबंबाळ केलं.
आपल्याच लोकांनी केलेल्या विश्वासघाताच्या थारोळ्यात पडलेल्या पवारसाहेबांना अशावेळी आधार कोण देणार?
गुणवत्ता नसतानाही ज्यांना संघटनेची आणि अनेक संविधानिक संस्थांची अध्यक्ष पदं मिळाली असे लोक की अत्यंत निरपेक्ष आणि निस्वार्थपणे आपला बाप या सगळ्या असुरी शक्तींशी लढतोय तो एकटा पडता कामा नये असं म्हणत पदर खोचून उभी राहिलेली लेक?
84 वर्ष वयोवृद्ध एकाच वेळी शारीरिक आजारांशी आणि आपल्याच रक्ता माणसांच्या नात्यातल्या लोकांनी केलेले वार झेलणाऱ्या आपल्या बापाला आधार देणारी लेक म्हणजे लुडबुड असं जर तुम्हाला वाटत असेल तर संवेदनशीलता हा शब्द तुम्हाला नव्याने शिकवण्याची गरज आहे.
तुमच्या या वाक्याने मला फरक पडतो आणि मलाच का माझ्यासारख्या असंख्य आईबापांना तो फरक पडेल .ज्यांना एकच आपत्य आणि तीही मुलगी असेल. तुमचं वाक्य हे भलेही तुम्ही राजकीय अभिनिवेषने उच्चारले असेल मात्र ते मुलगा मुलगी असा लिंगभाव करणारे वाक्य आहे. मुलींचे अधिकार नाकारणारे वाक्य आहे.
रूपालीजी, उगवतीच्या सूर्याला नमस्कार करणारे आणि मावळतीच्या सूर्याचा नजारा बघणारे अनगिनत असतात. त्यात तुमची एक भर पडली तर नवल ते काय ?
पण मावळतीचा सूर्य दिवसभर आपल्यासाठी कष्टत राहिलाय. अख्या जगाचा दाह त्याने पचवलाय. याची जाणीव ठेवत मावळतीच्या वेळी त्याच्या प्रति कृतज्ञतेने उभ राहणं याला माणुसकी म्हणतात. असो तुमचा आणि अशा माणुसकीचा फार परिचय झालेला दिसत नाही.
आपल्यात थोडी जरी सहसंवेदना शिल्लक असेल आणि अमुक एका पक्षाच्या पदाधिकारी म्हणून नाही तर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या पदाची गरिमा आणि राज्यातील फुले शाहू आंबेडकरांचा वैचारिक वसा वारसा कळत असेल तर आपण आपले शब्द परत घ्याल अशी अपेक्षा आहे. ( अर्थात ती फोल ठरेल म्हणा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -