घरमहाराष्ट्रमृतांची संख्या दीडशेच्या पार

मृतांची संख्या दीडशेच्या पार

Subscribe

राज्यात १९८२ करोना रुग्ण, पैकी १२९८ मुंबईत

राज्यात रविवारी २२१ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १९८२ झाली आहे. रविवारी राज्यात २२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईत १६, पुणे ३, नवी मुंबईचे २ आणि सोलापूरच्या एका रुग्णाचा समावेश आहे. रविवारी मृत्यू झालेल्यांपैकी १३ पुरुष तर ९ महिला आहेत. त्यातील ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत १५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एकजण ४० वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्यूमुखी पडलेल्या २२ पैकी २० रुग्णांमध्ये ( ९१ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी एकाला मलेरिया देखील होता.

करोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १५० पेक्षा जास्त झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४११०९ नमुन्यांपैकी ३७९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १९८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २१७ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ६१,२४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५०६४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

- Advertisement -

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ३७ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, यवतमाळ येथे ७, बुलढाणा जिल्ह्यात ६ , मुंबईत ३ तर प्रत्येकी २ जण पुणे,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर मनपा ,हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील ६ जण अहमदनगर येथे तर १ जण पिंपरी चिंचवड येथे करोना बाधित आढळले आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४८४६ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १७.४६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एकाच घरातील त्यांच्या सहवासातील २६ जण करोना बाधित आढळले होते. यातील २४ जणांना आता पर्यंत घरी सोडण्यात आले आहे. इस्लामपूरातील या भागात ३१ सर्वेक्षण पथकांनी मागील २ आठवडे साडेसात हजाराहून अधिक लोकसंख्येचे नियमित सर्वेक्षण केले आहे.

- Advertisement -

युरोपमध्ये ७५ जणांनी गमावले प्राण
करोना इटलीत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. युरोपमधील मृतांपैकी जवळपास ८० टक्के हे इटली, स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटनमधील रुग्ण आहेत. युरोपमध्ये आतापर्यंत ९ लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यातील ७५ हजार जणांना प्राण गमवावे लागले आहे. युरोपमध्ये सर्वाधिक मृत्यू १९ हजार ४६८ जणांचा मृत्यू इटलीमध्ये झाला आहे. स्पेनमध्ये १६ हजार ९७२ जणांचा मृत्यू झाला असून फ्रान्समध्ये १३ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. जर्मनीमध्ये एक लाख २५ हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. मात्र, जर्मनीत मृतांची संख्या कमी असून आतापर्यंत २८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये ७८ हजारजणांना करोनाची बाधा झाली असून ९ हजार ८७५ जणांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे.

देशात ८,४४७ करोनाबाधित
मुंबईत रविवारी २१७ करोना रुग्ण आढळले असून १६ जणांचा मृत्यू झाला आहे.देशातील करोनाच्या रुग्णांची संख्या ८ हजारांवर गेली आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे ९१८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे रुग्णांची संख्या ही ८,४४७ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत ३१ जणांचा करोनाने मृत्यू झाल्याने देशातील मृतांची एकूण संख्या २७३ इतकी झाली आहे तर ७६४ जण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. फक्त करोना रुग्णांसाठी ६०१ हॉस्पिटल्स देशात बनवण्यात येत आहे. या हॉस्पिटल्समधील बेडची संख्याही १ लाख ५ हजार इतकी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -