घरमहाराष्ट्रखालापूरमध्ये पाणी मिळणार घरोघरी

खालापूरमध्ये पाणी मिळणार घरोघरी

Subscribe

तालुक्याच्या विकासातील महत्त्वाचा अडसर असलेला शुद्ध पाण्याचा मुद्दा दोन महिन्यात निकाली निघणार आहे. नगरपंचायत हद्दीत जलवाहिनीद्वारे हे पाणी घरोघरी मिळणार आहे, अशी माहिती उपनगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी दिली. तसेच दोन पाणी योजनांमुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरण्यास मदत होणार आहे.

शहर हे तालुक्याचे ठिकाण असूनसुद्धा पिण्याचे शुद्ध पाणी न मिळणे, खंडित पाणी पुरवठा यामुळे अनेकांनी स्थलांतर करीत शेजारच्या खोपोली शहराची वाट धरली. खालापूरची जुनी पाणी पुरवठा योजना पाताळगंगा नदीवर होती. परंतु पाण्याला येणारा रसायनांचा उग्र दर्प आणि त्यातच जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने पाण्याचा वापर केवळ दैनंदिन कामासाठी होत असे. 12 वर्षांपूर्वी लोकसहभाग आणि शासन निधीतून ग्रामपंचायत काळात पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. कलोते-मोकाशी धरणालगत पाझर विहिरीवर ही योजना राबविण्याचे ठरले. सुरूवातीपासून ग्रहण लागलेली योजना तब्बल आठ वर्षांनी पूर्ण झाली. पण जलशुद्धीकरण यंत्रणाच अस्तित्त्वात नसल्याने पाण्याचा पिण्यासाठी वापर अद्याप होत नाही.

- Advertisement -

खालापूर ते कलोते-मोकाशी धरण अंतर 5 किलोमीटर असल्याने ही योजना सुरूवातीपासून खार्चिक बनली. इतक्या दूरवरून पाणी खालापूर साठवण टाकीत चढविण्यासाठी तासन्तास पंप सुरू ठेवावा लागतो. त्याचा परिणाम विद्युत मोटरमध्ये बिघाड होऊन यंत्रणा ठप्प होते. एकदा बिघाड झाला की किमान 4 दिवस पाण्याची बोंब असते. त्यामुळे दैनंदिन गरजेसाठी पाताळगंगा नदीवर आणि पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना विहिरीची वाट पकडावी लागते. या समस्येवर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी नगर पंचायतीने अखेर जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे पाताळगंगा नदीवरील जुनी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करायचे ठरवले आहे. दुसरी योजनादेखील याच नदी किनारी सावरोली पुलाजवळील विहिरीवर राबविण्याचे ठरविले आहे.

दोन्ही कामांचा नारळ फुटला असून, खालापुरातील मुख्य जलकुंभाला या जलवाहिन्या जोडण्यात येणार आहेत. याशिवाय नागरिकांची अनेक वर्षांची मागणी असलेली जलशुद्धीकरण यंत्रणा जलकुंभाजवळ कार्यान्वित होणार आहे. त्यांच्यासाठी नवीन वर्षाची ही एक प्रकारे भेट ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -