घरमहाराष्ट्रमतदानासाठी यंदा टोकन सिस्टिम

मतदानासाठी यंदा टोकन सिस्टिम

Subscribe

रांगा टाळण्यासाठीचा पहिलाच प्रयोग

लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागते. त्यामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला. विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी मतदारांना रांगेत तासन्तास उभे रहावे लागू नये म्हणून यंदा निवडणूक आयोगाकडून एक नवीन प्रयोग करण्यात येणार आहे. मतदानासाठी आलेल्या नागरिकांना चक्क टोकन देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांचा वेळ वाचणार आहे. तसेच त्यांचा त्रासही कमी होणार आहे. तसे नियोजन निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. साधारणपणे २०० ठिकाणी असा टोकनचा प्रयोग करण्यासाठी आवश्यक चाचपणी निवडणूक आयोगाकडून सध्या सुरू आहे

ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांना यंदाही मतदानाच्या रांगेत प्राधान्य देण्यात येणार आहे. पण सर्वसामान्य मतदारांसाठी टोकन पद्धत यंदा वापरण्यात येणार आहे. एकदा का टोकन घेतले की, रांगेत उभे रहायला नको, तुमचा नंबर तासभराने येणार असेल तर त्या अंदाजाने मतदान केंद्रात टोकन यायचे. त्यामुळे रांगेत उभे रहाण्याचा त्रास कमी होणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूक मतदानासाठी मुंबई शहराअंतर्गत एकूण ५२२ मतदान केंद्रे आहेत. पण त्यापैकी २०० ते २५० ठिकाणीच टोकन सिस्टिमची यंत्रणा उभारण्यात येईल, अशी माहिती उपमुख्य निवडणुक अधिकारी फुरग मुकादम यांनी दिली. पण अशा सिस्टिमसाठी किती लोक सहमती दर्शवतील, तसेच किती लोकांना हा प्रयोग आवडेल असा प्रश्न सध्या आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी उन्हाळा होता. त्यामुळे उष्णतेचा अनेक मतदारांना त्रास झाला. विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी ऑक्टोबर हिटचा फटका लक्षात घेता यंदा अनेक ठिकाणी विसाव्यासाठी मंडपांची व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्याठिकाणी जागा आहे अशा ठिकाणी टोकन सिस्टिमही उभारण्यात येईल. त्याठिकाणी मतदारांना बसण्यासाठी जागा मिळेल, तसेच आपला नंबर आल्यानंतर मतदान करण्यासाठी जाता येईल. त्यामुळे रांगेत ताटकळत रहाण्याचा वेळ कमी होईल.

दोनशेहून अधिक ठिकाणी बसण्यासाठीची जागा तसेच खुर्च्यांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. आपल्या छोट्या मुलांसह येणार्‍या पालकांसाठी अंगणवाडी सेविकांकडून विशेष कक्षाची सुविधाही करण्यात येणार आहे. साधारणपणे मतदान केंद्राच्या १५ मीटरच्या क्षेत्रात ही वेटिंग रूमची सुविधा देण्यात येणार आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंचे कारण
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना तब्बल ४ तास रांगेत उभे लागले होते. त्याची तक्रार राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही केली होती. ज्येष्ठ नागरिकांनी वेगळी रांग केल्यानेच राज ठाकरे यांना रांगेत ताटकळत उभे रहावे लागले हे कारण पुढे आले होते. प्राधान्याने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मतदानासाठी पाठवण्यात येत असल्यानेच मतदानासाठी मोठा विलंब झाला हे कारण पुढे आले होते. म्हणूनच यंदाच्या मतदानावेळी रांगा कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून उपाययोजना करण्यात येणार आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -