घरमहाराष्ट्र'जे करु तुमच्या सुखासाठी करु, धीर सोडू नका', मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना वचन

‘जे करु तुमच्या सुखासाठी करु, धीर सोडू नका’, मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना वचन

Subscribe

शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून लवकरात लवकर मदत जाहीर करु असे, आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले

अतिवृष्टीमुळे गेल्या दहा दिवसांपासून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून लवकरात लवकर मदत जाहीर करु असे, आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. “शेतकऱ्याचं आयुष्य अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालं आहे. पुढील दोन दिवसांत मंत्रीमंडळ बैठक होईल. जवळपास ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. लवकरात लवकर आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध आहे. आकडे लावण्यासाठी मी आलेलो नाही. जे करु तुमच्या सुखासाठी करु. धीर सोडू नका, खचून जाऊ नका,” असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले.

- Advertisement -

तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. येत्या दोन ते तीन दिवसांत मंत्रीमंडळ बैठक घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बळीराजाला दिली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काटगाव येथे जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उस्मानाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री शंकरराव गडाख खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील विभागीय सुनील केंद्रेकर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्यासह शेतकरी व काटगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -

“आम्ही परिस्थितीचा अंदाज घेत आहोत. अतिवृष्टी होण्याच धोका कमी झाला आहे. पण पुढील सात ते आठ दिवस वातावरण बिघडू शकते असे हवामान विभागाने सांगितले आहे. सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणाऱ्यातला मी नाही. जे बोलतो ते मी करतो, पण करू शकत नाही असं बोलत नाही. तुम्ही सर्वजण मला ओळखता. तुम्हाला बरे वाटावे, टाळ्या वाजवाव्यात यासाठी आकडा जाहीर करणार नाही. मी दिलासा देण्यासाठी आलो आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.


मुख्यमंत्र्यांचा आज पाहणी दौऱ्याचा तिसरा दिवस; शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणेची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -