घरमहाराष्ट्रRam Mandir Ayodhya : राम मंदिरात रामाची प्रतिमा असेल का? अटल सेतूवरुन...

Ram Mandir Ayodhya : राम मंदिरात रामाची प्रतिमा असेल का? अटल सेतूवरुन उद्धव ठाकरेंचा सवाल

Subscribe

मुंबई – अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होऊन प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. मात्र तिथे रामाचीच मूर्ती असणार का? असा खोचक सवाल शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे लोकार्पण करण्यात आले. मात्र ज्यांच्या नावाने हा सागरी सेतू आहे त्यांचा फोटो, प्रतिमा ही मंचावर नव्हती यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

शिवसेना (ठाकरे गट) 22 जानेवारीला नाशिक येथील काळाराम मंदिरात पूजा आणि संध्याकाळी गोदावरी घाटावर आरती करणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करणार असल्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचे उद्घाटन होत आहे, परंतू मंदिरामध्ये प्रभू रामाचीच मूर्ती असेल का, असा मिश्किल टोला लगावला आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘अटल सेतूचे उद्घाटन केले पण अटल बिहारी वाजपेयींचा फोटोच तिथे लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे अयोध्येत राम मंदिरात प्रभू रामाची प्रतिमा असेल ना, अशी शंका उपस्थित होते.’

‘शिवसेनेचे योगदान काय, लखनऊ कोर्टात जाऊन पाहा’

- Advertisement -

श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे शिवसेना (ठाकेर गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या या सोहळ्याचे निमंत्रण नाही, याबद्दल भाजप नेत्यांना सवाल केला असता, राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचे योगदान काय? असा सवाल केला जातो, यावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले, ‘जे विचारतात शिवसेनेचे योगदान काय, त्यांनी लखनऊ कोर्टात जावे आणि बाबरी पाडणाऱ्या आरोपींच्या नावांची यादी पाहावी. त्यांना कळेल शिवसेनेचे योगदान काय आहे. त्यामध्ये सर्वाधिक नावे ही शिवसैनिकांची आहेत.’

‘राम मंदिर कोणाची खासगी मालमत्ता नाही’

राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘आज जे राम मंदिराचे झेंडे लावत आहेत, जेव्हा बाबरी मशिद पाडली गेली तेव्हा ते कुठे होते, याचेही उत्तर त्यांनी दिले पाहिजे. राम मंदिर मुद्दा थंड बस्त्यात पडला होता, तेव्हा ‘पहिले मंदिर, फिर सरकार’ ही घोषणा आम्ही दिली होती.’ असेही ठाकरे म्हणाले.
शिवजन्मभूमीची माती घेऊन आम्ही अयोध्येला गेलो होतो. त्यानंतर कोर्टाने राम जन्मभूमीचा निकाल दिला, याची आठवण करुन देत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आम्ही अयोध्येला जाणार, कारण ती काही कोणाची खासगी मालमत्ता नाही. याआधीही अनेकदा गेलो आहे आणि यापुढेही जाणार आहे.’ असेही ठाकरे म्हणाले.

देशातील चार शंकराचार्यांनी राम मंदिर उद्घाटनला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे त्यांनी हे उद्घाटन चुकीचे असल्याचा अक्षेप घेतला आहे. याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शकंराचार्यांनी शास्त्रानुसार सर्व विधि झाले पाहिजे असे म्हटले आहे, त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही भाजपने बोलावे, असे ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : Ayodhya SriRam Temple: प्राणप्रतिष्ठेसाठी राष्ट्रपतींना निमंत्रित करावे; शिवसेनेकडून काळाराम मंदिरातील पूजेसाठी मुर्मूंना निमंत्रण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -