घरमहाराष्ट्रएसटी कर्मचारी संपावर ठाम

एसटी कर्मचारी संपावर ठाम

Subscribe

समिती गठीत करण्याचा जीआर अमान्य

राज्य शासनाच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने एक समिती गठीत करण्याचा जीआर काढला आहे. मात्र, हा जीआर अमान्य असल्याचे सांगत एसटी कर्मचार्‍यांनी आपण संपावर ठाम आहोत. संपाच्या 11 व्या दिवशीही तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचार्‍यांचा संप अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे सोमवारी राज्यातील २५० एसटी आगरांपैकी २२३ आगर बंद होती. तेथून एकही गाडी बाहेर जाऊ शकली नाही.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी गेल्या 11 दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. सोमवारी कोर्टात संपाबाबतची सुनावणी झाली. त्यानंतर एसटी कर्मचार्‍यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मीडियाशी संवाद साधत कोर्टातील कार्यवाहीची माहिती दिली. 36 एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे आम्ही दुखवटा पाळत असून त्यासाठीच संप पुकारला आहे. हा संप फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या दुखवट्याला पोलिसी बळावर हात लावण्याचा प्रयत्न करू नका, असे सदावर्ते म्हणाले.

सरकारची घुमजावची भूमिका आहे. सरकारचा खोटारडेपणा सुरू आहे. त्यामुळे आम्ही आमचा पूर्वीचा युक्तिवाद न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. हेच ते कारण होतं. एखाद्या जातीच्या संदर्भात कर्नाटकाचा संदर्भ दिला जातो. मग एसटी कर्मचार्‍यांबाबत तेलंगणाचा संदर्भ यांना अमान्य का झाला? पॅरेग्राफ सहा या पॉलिसीत का आणला नाही? हे सरकार खोटारडआहे. 82 हजार लोकांची मते न्यायालयात मांडली. सह्यांसहीत आमची मते कोर्टाला दिली. आम्हाला तुरुंगात टाकण्याची भाषा ठाकरे सरकारकडून केली जात होती. गांधी-आंबेडकरांप्रमाणे आम्ही 82 हजार लोक तुरुंगात जावून बसायला तयार आहोत. आम्ही अन्नत्याग करायला तयार आहोत. मग चर्चा तुरुंगातच होऊ द्या, असे आम्ही सरकारला स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

२२३ डेपो ठप्प
सध्या एसटी कर्मचार्‍यांचा राज्यव्यापी संप सुरू असून 250 पैकी 22३ डेपोतील कामकाज ठप्प आहे. राज्य परिवहन महामंडळ सतत तोट्यात असल्याचा फटका कर्मचार्‍यांनाही बसत असून एसटी तोट्यात असल्याचे कारण देत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतन वाढ नाही. कोरोना संकटकाळात सेवा बजावताना 306 एसटी कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर आर्थिक विवंचनेतून आतापर्यंत अनेक कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या. अशी बिकट परिस्थिती असतानाही सरकार एसटी तोट्यात असल्याचे कारण देत कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करून पूर्णत्वास नेत नाही. त्यामुळे आता एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याशिवाय पर्याय नाही. अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली असून त्यासाठीच त्यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याविरोधात महामंडळाने तातडीने एका याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

चंद्रपुरात एसटी कर्मचार्‍याची विष पिऊन आत्महत्या

राज्यातील एकीकडे एसटी कर्मचार्‍यांनी वेतन आणि इतर मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मात्र, दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका एसटी कर्मचार्‍याने विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या कर्मचार्‍याच्या आत्महत्येमुळे एसटी कर्मचारी वर्गात सरकारविरोधात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.

- Advertisement -

सत्यजित ठाकूर असे या एसटी कर्मचार्‍याचे नाव आहे. केवळ ते ३४ वर्षांचे होते. चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी एसटी आगारात ते वाहतूक नियंत्रक पदावर काम करत होते. त्यांच्या पश्चात त्यांना एक चार महिन्यांची मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांची पत्नी नागपूरला राहत होती. दोन दिवसांपूर्वीच सत्यजित ठाकूर नागपूरहून ब्रह्मपुरीला आले होते. त्यानंतर ते फारसे कोणाला भेटलेही नाहीत.

मात्र, सोमवारी सकाळी सत्यजित ठाकूर यांची पत्नी त्यांना वारंवार फोन करत होती तेव्हा त्यांनी एकही कॉल उचलला नाही. यावेळी शंका आल्याने पत्नीने त्यांच्या सहकार्‍यांना आणि आजूबाजूच्या लोकांना कॉल केला. यावेळी एसटी आगारातील त्यांच्या सहकार्‍यांनी ठाकूर यांच्या घरी धाव घेतली. यावेळी सत्यजित ठाकूर घरात मृत अवस्थेत आढळून आले. मात्र, आत्महत्येपूर्वी सत्यजित ठाकूर यांच्याजवळ कोणतीही सुसाईट नोट सापडलेली नाही. सध्या पोलिसांकडून त्यांचा मोबाईल आणि कागदपत्रांचा तपास सुरू आहे.

एसटी कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा आणि लोकांना वेठीस धरू नये. सरकारने हायकोर्टाच्या निर्देशानंतर समिती स्थापन करण्याबाबत जीआर काढला. आता हायकोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या आडून कोणी राजकारण करू नये.
-अ‍ॅड. अनिल परब, परिवहन मंत्री.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -