घरमहाराष्ट्रUnseasonal rain : राजा मस्त आणि प्रजा त्रस्त..., ठाकरे गटाचा राज्य सरकारवर...

Unseasonal rain : राजा मस्त आणि प्रजा त्रस्त…, ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : ‘रोम जळत असताना, नीरो फिडल वाजवत होता’ अशी एक ऐतिहासिक म्हण आहे. फरक इतकाच की, कटकारस्थाने करून सत्तेवर आलेला नीरो रोम जळत असताना फिडल हे वाद्य वाजवत बसला होता आणि अवकाळीच्या संकटात शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना महाराष्ट्राचे आधुनिक नीरो निवडणूक प्रचारात रमले आहेत. राजा मस्त आणि प्रजा त्रस्त, शेतकरी बेजार आणि सरकार पसार अशी स्थिती महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हती, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Unseasonal rain : शेतकऱ्यांनी निसर्गाचे असे काय घोडे मारले आहे… ठाकरे गट उद्विग्न

- Advertisement -

पावसाळ्यातही झाले नाही असे विजांचे तांडव, ढगांचा भयंकर गडगडाट, तुफानी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यांतील शेती व शेतमाल उद्ध्वस्त झाला आहे. शेतशिवारांमध्ये सर्वत्र पाणी साचले आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार या भागांमध्ये हजारो हेक्टरवरील पिके आणि फळबागांची भयंकर हानी झाली आहे. त्यामुळे हतबल झालेल्या हजारो शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्यातील मिंधे सरकार इतर राज्यांतील निवडणूक प्रचारात मशगुल आहे. अशा सत्ताधाऱ्यांना मायबाप कसे म्हणणार? असा सवाल ठाकरे गटाने सामना दैनिकातील अग्रलेखातून केला आहे.

सततच्या या संकटांमुळे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी खचला आहे. कधी सुदैवाने निसर्गाने साथ दिली आणि बंपर उत्पन्न झाले तर, नेमके तेव्हाच या शेतमालाचे भाव कोसळतात आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, अशा बाता सरकार मारते; पण शेतकरी खरोखरच उत्पादन वाढवतो तेव्हा त्याच्या हाती काहीच उरत नाही ही वस्तुस्थिती आहे व त्यावर सरकारी पोपट काही बोलत नाहीत, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Subhash Desai : तुमचा लोकांवर का विश्वास नाही? जाहिरातबाजीवरून सुभाष देशाईंची सरकारवर टीका

बाजारपेठेत नेण्याचाही खर्च निघत नसल्याने शेतकरी आपला शेतमाल फेकून देत असताना, अतिवृष्टी व अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतमाल व बागा उद्ध्वस्त होत असताना वा दुष्काळामध्ये पिके करपून जात असताना जेव्हा शेतकरी संकटात सापडतो तेव्हा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे, शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र कटकारस्थाने, लोकप्रतिनिधींची खरेदी-विक्री आणि निवडणूक प्रचारात रमलेले सरकार या कर्तव्यात कसूर करत असल्यामुळेच महाराष्ट्रात सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

सरकारची बेपर्वाई आणि अनास्था यामुळे शेतकरी इतके देशोधडीला लागले आहेत की, अवयव विक्री करून गुजराण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील 10 शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाला भाव मिळत नसल्यामुळे किडनी, लिव्हर, डोळे व इतर अवयव विकत घेण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडेच केली आहे. याच हिंगोली जिल्ह्याला आता अवकाळीचाही फटका बसला आहे. या संकटामुळे तिथे आता अवयव विक्रीसाठी रांगा लावण्याची वेळ येऊ नये, म्हणजे झाले, अशी भीतीही ठाकरे गटाने व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -