घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंना सोडणं आम्हालाही परवडणारं नाही, संजय राऊत हतबल

एकनाथ शिंदेंना सोडणं आम्हालाही परवडणारं नाही, संजय राऊत हतबल

Subscribe

एकनाथ शिंदे किंवा इतर सहकारी असतील, त्यांच्याशी आमचा व्यवस्थित संवाद सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्ही एकत्र आहोत, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.

मुंबईः एकनाथ शिंदेंनाही पक्ष सोडणं सोपं नाही. तसेच आम्हालाही त्यांना सोडणं परवडणारं नाही, असं म्हणत एकनाथ शिंदेंच्या काही मागण्या नाहीत, ते शिवसैनिक आहेत. ते शिवसैनिक म्हणूनच आयुष्य काढतील, असंही शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत. संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

भाजपला वाटत असेल ठाकरे सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, तर शिवसेनेमध्ये राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे. शिवसेनेने अनेकदा राखेतून जन्म घेऊन अनेकदा गरुडझेप घेतलेली आहे. हा गेल्या 56 वर्षांचा इतिहास आहे. पण एकनाथ शिंदे हे आमचे मित्र आणि सहकारी आहेत. अत्यंत जीवाभावाचे सहकारी आहेत. अनेक वर्षे आम्ही एकत्र काम करतोय, त्यांच्यासोबत जी चर्चा सुरू आहे, ती सकारात्मक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

राज्यपालांना कोरोना झालाय, त्यामुळे त्यांचं काम थोडं स्लो सुरू आहे. सर्वात आधी राज्यपाल साहेब ठीक व्हायला पाहिजे, मग बघू कोणाकडे किती आमदार आहेत. तुम्ही उतावीळ होऊ नका. आम्हाला पूर्ण खात्री आणि विश्वास आहे, एकनाथ शिंदेंसोबत सर्व लोक स्वगृही परत येतील. हा आमच्या घरातला विषय आहे, हे सगळं लोक परत घरात येतील. एकनाथ शिंदे किंवा इतर सहकारी असतील, त्यांच्याशी आमचा व्यवस्थित संवाद सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्ही एकत्र आहोत, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.


आज सकाळीच माझं एकनाथ शिंदेंशी बोलणं झालंय. एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांपासून आतापर्यंत त्यांनी शिवसेनेसोबतच काम केलं आहे. त्यांच्याविषयी आमच्या मनात कायम सदभावना आहेत. आज सकाळी त्यांचं आणि माझं बोलणं झालं. त्यासंदर्भात मी माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही कल्पना दिलीय. कोणाला आनंदाचं भरतं आलं असेल तर तसं नाही. जे आहेत ते सगळे शिवसैनिक आहेत आणि त्या सगळ्यांना शिवसेनेबरोबरच राहायचं आहे. काही समज-गैरसमज असतात, त्यातून या गोष्टी घडल्या असतील तर द्या दूर होतील, असंही त्यांनी म्हटलंय.

- Advertisement -

हेही वाचाः राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण, रिलायन्स रुग्णालयात केले दाखल

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -