शिक्षणमंत्र्यांचे आदेश धुडकावून मुंबईत १० वी १२ वीचे वर्ग सुरू

राज्यात १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्याचे राज्य शासनाचे आदेश असतानाही मुंबईत शिक्षणमंत्र्यांचे आदेश धुडकावत १० वी १२ वीचे वर्ग भरविले जात आहेत.

corona omicron closure of pune schools for classes 1 to 9 till January 30

राज्यात १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्याचे राज्य शासनाचे आदेश असतानाही मुंबईत शिक्षणमंत्र्यांचे आदेश धुडकावत १० वी १२ वीचे वर्ग भरविले जात आहेत. त्यामुळे शिक्षण विभागात एकवाक्यता नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघून राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शिक्षकांनीही ऑनलाईन शिकविण्याचे आदेश देण्यात आले. मात्र १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वा इतर कामासाठी बोलविण्याचे अधिकार शाळांना आहेत. याचाच सोयीचा अर्थ लावीत अनेक शाळांनी १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांचे वर्ग घेत आहेत. अनेक शाळांनी तर पूर्व परीक्षांचे आयोजन करून कोविडच्या फैलावाला रितसर आमंत्रण दिले आहे. काही शाळांमध्ये शिक्षकांना कोरोना संसर्ग झाल्यावरसुद्धा नेमके काय करावे? शाळेबाबत नेमके काय करावे याबाबत शिक्षण विभागाकडून स्पष्टपणे कोणतीही सूचना मिळाली नाही, त्यामुळे शाळांमधील मुख्याध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तर ऑनलाईन शिक्षणाचे आदेश असूनही विनाकारण शाळेत बोलवण्यात येत असल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे.