घरमुंबईकांदिवली येथे 52 वर्षांच्या व्यक्तीची हत्या

कांदिवली येथे 52 वर्षांच्या व्यक्तीची हत्या

Subscribe

कांदिवली येथे दिपक शिवराम घाग या 52 वर्षांच्या व्यक्तीची त्याच्याच परिचित व्यक्तीने डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या केली. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी उमेश नायक याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजता कादिवलीतील डहाणूकरवाडी, स्मशानभूमी रोडवरील शिवशंकर एसआरए सोसायटीमध्ये घडली. या सोसायटीमध्ये मृत दिपक घाग हा त्याची पत्नी दिपासोबत राहत होता. तिथे राहणारा कैलास धनवडे हा नेहमीच दारुच्या नशेत स्थानिक रहिवाशांसोबत वाद घालत होता. याबाबत त्याच्याविरुद्ध रहिवाशांनी तीन ते चार वेळा पोलीस तक्रारही केली होती. मात्र त्याच्याविरुद्ध पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही.

- Advertisement -

गुरुवारी रात्री कैलास हा नेहमीप्रमाणे मद्यप्राशन करुन आला आणि त्याने सोसायटीच्या सुरक्षारक्षकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा प्रकार समजताच दिपक, त्याची पत्नी दिपा, सेक्रेटरी शिवाजी चव्हाण यांच्यासह इतर रहिवाशांनी तिथे गेले होते. त्यांच्यातील वाद सोडण्याचा प्रयत्न सुरु असताना कैलासच्यावतीने उमेश नायक हा सोसायटीच्या रहिवाशांसोबत भांडण करु लागला.

डोक्यात पेव्हर बॉक मारला
यावेळी रागाच्या भरात दिपकने त्याच्या कानशिलात लगावली. त्याचा राग आल्याने त्याने दिपक यांच्यावर पेव्हर ब्लॉकने मारहाण केली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दिपक हे जागीच कोसळले. त्यांना तातडीने स्थानिक रहिवाशांनी कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

- Advertisement -

उमेशला खूनाच्या गुन्ह्यात अटक
या घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दिपा घागच्या तक्रारीवरुन पोलिसांनी उमेशविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -