घरमुंबई९२ पुलांचे पुन्हा झाले स्ट्रक्चरल ऑडिट

९२ पुलांचे पुन्हा झाले स्ट्रक्चरल ऑडिट

Subscribe

हिमालय पुलाच्या दुघर्टनेनंतर यापूर्वी करण्यात आलेल्या पुलांचे फेर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना पूर्व व पश्चिम उपनगरातील संबंधित कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत दोन्ही ठिकाणांकडील ९२ पुलांच्या ऑडिटचे काम या कंपन्यांनी केले आहे.

मुंबईतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांच्या बांधकामांची माहिती संकलित करण्यासाठी २०१६ मध्ये शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांसाठी स्वतंत्र ऑडिट करण्यासाठी कंपन्यांची नेमणूक करण्यात आली होती. मुंबईत सध्या महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ३१४ पूल आणि एमएमआरडीए व एमएसआरडीसी यांचे ३० असे एकूण ३४४ पूल आहेत. या ३४४ उड्डाणपूल व पादचारी पूल तसेच भुयारी मार्गांपैकी २९६ पुलांचे ऑडिट करण्यासाठी शहर भागासाठी डि.डि. देसाई अँड कंपनी, पूर्व व पश्चिम उपनगरांसाठी ‘स्ट्रक्टवेल’ तसेच ‘कांड’ या कंपनीची निवड करण्यात आली. त्यातील २४६ पुलांचे ऑडिट या कंपन्यांनी केले होते.

- Advertisement -

मात्र हिमालय पूल दुघर्टनेनंतर स्ट्रक्चरल ऑडिट कंपनीला दोषी ठरवून काळ्या यादीत टाकून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. त्यानंतर पूर्व व पश्चिम उपनगरांमधील पुलांचे फेर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार पूर्व उपनगरांतील १८ पुलांचे तर पश्चिम उपनगरांतील ७४ पुलांचे ऑडिट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

शहर भागातील ८२ पुलांसाठी नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. मात्र, कोर्टाने महापालिकेला खासगी स्ट्रक्चरल ऑडिट ऐवजी आयआयटी व व्हीजेटीआयसारख्या नामांकित संस्थेची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मोठ्या पुलांचे ऑडिट हे आयआयटी व व्हीजेटीआय सारख्या संस्थेची नेमणूक करण्याचा विचार प्रशासनाच्यावतीने होत आहे. तसेच शहर भागातील पुलांच्या ऑडिटसाठीही याच संस्थांचा विचार केला जाईल, असे महापालिकेच्या पूल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -