घरमुंबईमाटुंगा झेड ब्रिजला जोडणारा पूलही धोकादायक!

माटुंगा झेड ब्रिजला जोडणारा पूलही धोकादायक!

Subscribe

माटुंगा रोड रेल्वे स्थानकाला जोडणार्‍या पादचारी पुलाला तडे गेल्याची छायाचित्रे व्हायरल होताच अनेकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेे. याबाबत अद्याप महापालिका प्रशासनाने कार्यवाही केलेली नसताना आता माटुंगा झेड ब्रिजला जोडणार्‍या माटुंगा सेंट्रल वर्कशॉप समोरील पादचारी पूलही धोकादायक स्थितीत आला आहे. या पुलावरील लाद्या उखडल्या आहेत. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे हा पूल अधिक उंचीवर आहे. त्यामुळे भविष्यात जर दुर्घटना घडली तर या ठिकाणी हिमालय पुलाप्रमाणे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.

झेड ब्रिजला जोडणार्‍या या पादचारी पुलाला मोठी भेग आरपार पडली असून, यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एवढेच नव्हेतर या पुलावरील लाद्या उखडल्या आहेत. उखडलेल्या लाद्यांमुळे पादचार्‍यांना नीट चालता येत नाही. तसेच या पुलाचे खांबही खराब होऊन त्यांचे काँक्रीट निखळून पडलेले आहे. सीएसएमटी येथील हिमालय पूल पडल्यानंतर या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार्‍या कंपनीला काळ्या यादीत टाकून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी शहरातील सर्व पुलांचे फेर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाने फेर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी स्वारस्य अर्ज मागवले आहेत. या दरम्यान, मुंबई हायकोर्टाने सोमवारी, या पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत निर्देश देताना हे खासगी कंपनीऐवजी आयआयटीसारख्या तज्ज्ञ कंपन्यांकडूनच हे ऑडिट करावे, असे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

त्यामुळे माटुंगा रेल्वे वर्कशॉपसमोरील झेड ब्रिजला जोडणार्‍या धोकादायक पादचारी पुलाचेही स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी मनसेचे माजी नगरसेवक मनिष चव्हाण यांनी केली आहे. या पुलाची डागडुजी व नूतनीकरण करण्याची मागणी मनिष चव्हाण यांनी ते नगरसेवक असताना चार वर्षांपूर्वी केली होती, परंतु महापालिका प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात येणार असून, याचे कंत्राट देण्यात आले असल्याची माहिती पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -