घरमुंबईतब्बल २२ कोटींची फसवणूक करणाऱ्याला एक वर्षानंतर अटक

तब्बल २२ कोटींची फसवणूक करणाऱ्याला एक वर्षानंतर अटक

Subscribe

सुमारे २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सायरस नौशिरवान कात्रक या मुख्य आरोपीला आंबोली पोलिसांच्या एका विशेष पथकाने नाशिकच्या पाचगणी परिसरातून शिताफीने अटक केली आहे.

सुमारे २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सायरस नौशिरवान कात्रक या मुख्य आरोपीला बुधवार, ३१ ऑक्टोबर रोजी आंबोली पोलिसांच्या एका विशेष पथकाने नाशिकच्या पाचगणी परिसरातून शिताफीने अटक केली. फसवणुकीच्या गुन्ह्यांत शिक्षा होताच सायरस हा पळून गेला होता. गेल्या एक वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला विशेष सत्र न्यायालयाच्या आदेशावरुन नवी मुंबईतील तळोजा कारागृहात पाठविण्यात आले आहे. मुंबईचा रहिवाशी असलेला सायरस हा व्यावसायिक आहे. त्याने तीन वर्षांपासून स्वतःचा व्यवसाय सुरु होता. मात्र प्रचंड मेहनत घेऊनही त्याला व्यवसायात यश आले नाही. व्यवसायातील नुकसानीमुळे त्याने लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली होती.

नाव बदलून राहत होता सायरस

काही वर्षांपूर्वी त्याची संजय मेहता या व्यावसायिकाशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्याने त्यांचा विश्वास संपादन करुन सुमारे २२ कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी संजय मेहता यांनी आंबोली पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. या गुन्ह्यांसह त्याच्याविरुद्ध सतरा चेक बाऊन्ससह आर्थिक गुन्हे शाखेत अन्य एका फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद होती. फसवणुकीच्या याच गुन्ह्यात त्याला विशेष सत्र न्यायालयाने अठरा वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र शिक्षा होताच तो पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी आंबोली पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोध मोहीम सुरु असतानाच सायरस हा साजिद खान या नावाने त्याच्या प्रेयसीसोबत मीरारोड परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांच्या पथकातील रविंद्र कळमकर, काळे, पावरे, नागे, गांगुर्डे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. मात्र पोलिसांची चाहूल लागताच तो पळून गेला होता. त्यानंतर तो नाशिकच्या पाचगणी परिसरात वास्तव्यास होता, या माहितीनंतर या पथकाने पाचगणी येथून सायरस याला अटक केली.

- Advertisement -

एक वर्षानंतर पोलिसांच्या हाती लागला 

पोलीस तपासात शिक्षा झाल्यानंतर सायरसने घरातील सर्वांशी संबंध तोडून टाकले होते. तो कुणाच्याही संपर्कात नव्हता. त्याचा शोध घेण्यासाठी आंबोली पोलिसांनी पाच हजार क्रमांक तपासले होते. मात्र गेल्या एक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला एक वर्षांनी पाचगणी येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला नवी मुंबईतील तळोजा कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -