घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरेंच्या हस्ते राणी बागेतील प्राणी प्रदर्शन कक्ष, उद्यान व सांडपाणी प्रकल्पाचे...

आदित्य ठाकरेंच्या हस्ते राणी बागेतील प्राणी प्रदर्शन कक्ष, उद्यान व सांडपाणी प्रकल्पाचे लोकार्पण

Subscribe

मुंबईत देश, विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी हक्काचे व आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक पर्यटनस्थळ म्हणून उदयाला येत असलेल्या भायखळा येथील राणी बागेत (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय) पालिका व उद्यान प्रशासन यांनी नवीन स्वरूपात साकारलेल्या प्राण्यांचे आधुनिक प्रदर्शन कक्ष, माकड प्रदर्शनी, पक्ष्यांचे नंदनवन, बायोम थीम आधारित उद्याने, सांडपाणी पुनर्वापर प्रक्रिया संयंत्र आदी विकास कामांचे लोकार्पण पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी १६ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.

विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून राणी बागेने गेल्या काही वर्षात कात टाकली आहे. जुन्या राणी बागेचे रूपांतर आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘झू पार्क’ मध्ये होत आहे. राणी बाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्‍या बृहत् (मांडणी) आराखड्यामध्‍ये दोन नवीन भूखंडांचा समावेश करुन व इतर सुधारणांसह सुधारित बृहत् (मांडणी) आराखड्यास केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (नवी दिल्ली) यांची अंतिम मंजुरी प्राप्‍त झाली होती. त्यानुसार महापालिकेने या उद्यानामध्ये विविध लोकोपयोगी मनोरंजनाची साधने विकसित केली आहेत. यापूर्वी, पेंग्विन कक्ष साकारून त्यात विदेशातून पेंग्विन आणले. या पेंग्विन कक्षात दररोज हजारो पर्यटक भेट देऊन पेंग्विनला अगदी जवळून पाहतात व त्याचा मनमुराद आनंद लुटतात.

- Advertisement -

सांडपाणी पुनर्वापर प्रक्रिया संयंत्र

राणी बागेत विविध झाडे, प्राणी/पक्षी यांजकरिता पिण्‍यासाठी, सिंचनासाठी मोठ्या दररोज सुमारे ३ ते ५ लाख लीटर पाण्‍याची आवश्‍यकता असते. त्यामुळे निव्वळ महापालिकेच्‍या पाणीपुरवठ्यावर अवलंबून न राहता स्‍वबळावर सर्व सुविधा चालविण्‍याच्‍या दृष्‍टीने सांडपाणी पुनर्वापर प्रक्रिया यंत्रणा तयार करण्‍यात आली आहे. या यंत्रणेअंतर्गत प्रतिदिन सुमारे ५ लाख लीटर प्रक्रिया केलेले पाणी मिळणार आहे. तर सुमारे ७ लाख लीटर पाण्‍याची क्षमता असलेल्‍या भूमिगत टाकीमध्‍ये प्रक्रिया केलेले पाणी साठविण्‍यात येणार आहे. शुद्धीकरण केलेले हे पाणी पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी म्हणजे प्राणिसंग्रहालय परिसरातील जलसिंचन प्रणालीशी जोडून संपूर्ण परिसरास सिंचनासाठी, पिंजरे धुण्यासाठी आदी कामांसाठी वापरण्यात येणार आहे.

पक्ष्यांचे नंदनवन

राणी बागेत नवीन तयार करण्‍यात आलेल्‍या पक्ष्यांच्या नंदनवनात वॉक थ्रू सुविधेसह तयार करण्यात आलेली प्रदर्शनी अत्‍यंत भव्‍य आहे. काचेच्‍या प्रदर्शन गॅलरीमधून नैसर्गिक अधिवासात रुळलेल्या पक्ष्‍यांचे, विविध झाडे-झुडुपे, घरटी यांचे निरीक्षण करता येते. तयार करण्‍याच्‍या जागा, खेळणी, पाणी पिण्याच्या सुविधा इत्यादी पाहता येतात. युरोपियन तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या या प्रदर्शनीमध्‍ये प्रामुख्‍याने धनेश, पोपट, सोनेरी तितर, मोर, कोकॅटिल, मिलिटरी मकाऊ, आफ्रिकन करडा पोपट आदी पाणपक्षी प्रदर्शित करण्‍यात आले आहेत.

- Advertisement -

माकड प्रदर्शनी

माकडांकरिता तयार करण्‍यात आलेले आवासस्‍थान अत्‍यंत भव्‍य आहे. प्रदर्शन गॅलरीमधून आतील भागात तयार करण्‍यात आलेले कृत्रिम निवास, आकर्षक संरचना, झोपाळे इत्यादी सुविधांचा आनंद घेताना माकडे पाहण्‍यास मिळतील.

बायोम थीम आधारित उद्याने

विविध प्रकारच्‍या हवामान क्षेत्रांमध्‍ये उगवणाऱ्या वनस्‍पती संस्‍थावर आधारित उद्यान, ज्‍यापैकी या प्राणिसंग्रहालयामध्‍ये खालील प्रकारच्‍या परिसंस्‍था तयार करण्‍यात आल्‍या आहेत. उष्णकटिबंधीय परिसंस्‍था गरम, दाट झाडीमुळे ओळखल्‍या जातात. या परिसंस्‍था भारतात पश्चिम घाटात आढळतात. पाऊस जास्त असल्‍यामुळे झाडे मुसळधार पावसाशी जुळवून घेतात. झाडे सदा‍हरित असून त्यांना निमुळती, जाड, मेणासारखी पाने असतात.


हेही वाचा : कोकणातून जाणाऱ्यांनो जरा थांबा! चिपळूणचा परशुराम घाट 20 एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -