घरताज्या घडामोडी'शिवसेनेबरोबरच जुळवून घ्यायचंय', अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र!

‘शिवसेनेबरोबरच जुळवून घ्यायचंय’, अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र!

Subscribe

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी शिवसेनेसोबतच्या आघाडीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. ‘स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत खटके उडत असले, तरी त्यांच्यासोबतच जुळवून घ्यायचंय’, असं अजित पवार म्हणाले आहेत. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये बोलावण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये त्यांनी हे विधान केलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा आणि त्याआधीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांना या बैठकीला बोलावण्यात आलं होतं. या उमेदवारांना आणि पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी यावेळी मार्गदर्शन केलं. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर अजित पवारांनी केलेलं हे विधान महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यानंतर भाई जगताप यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आगामी मुंबई महानगर पालिकांसाठी काँग्रेस स्वबळावर प्रयत्न करणार असल्याची भूमिका मांडली होती. यानंतर महाविकासआघाडीमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्यातच, काँग्रेस पक्षाची आधीपासूनच असलेली नाराजी वेळोवेळी काँग्रेसच्या नेतेमंडळींनी बोलून देखील दाखवली होती. त्यामुळे एकीकडे काँग्रेसकडून अशा प्रकारे उघड भूमिका घेतली जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र आज शिवसेनेसोबत जुळवून घ्यायची भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही मित्रपक्षांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याचं स्पष्ट झालं आहे.

- Advertisement -

या बैठकीमध्ये अजित पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख आदी नेते मंडळी आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर काही प्रमाणात स्थानिक पातळीवर वाद झाल्याचं दिसून आलं. पण आपल्याला शिवसेनेसोबत कायम राहायचं आहे’. दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही मित्रपक्षांनी अशा भूमिका घेतल्या असल्यामुळे मुंबई महानगर पालिका निवडणुकांसोबतच राज्यातल्या इतर महानगर पालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय परिस्थिती असेल, याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -