घरमुंबई१८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना मिळणार लोकलचे तिकीट

१८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना मिळणार लोकलचे तिकीट

Subscribe

राज्यामध्ये 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू झाली. मात्र, लोकलमध्ये प्रवेश नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाणे अवघड होत होते. मात्र, आता 18 वर्षांखालील मुलांना लोकलचे तिकीट देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबईतील, पनवेलमधील शाळा, महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थ्यांचा प्रवासाचा मार्ग मोकळा झाला असून, त्याना दिलासा मिळाला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने आता टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत आहे. नुकतेच शालेय शिक्षण विभागाने 4 ऑक्टोबरपासून शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र, लोकल प्रवासाची मुभा नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाणे शक्य नव्हते. त्यांना शाळा व महाविद्यालयात जाणे अडचणीचे ठरत होते. विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालय गाठण्यासाठी बस, रिक्षा किंवा टॅक्सीने जावे लागत होते. तर काही विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांना मोटरसायकल किंवा गाडीतून सोडावे लागत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना रेल्वे तिकीट देण्याची मागणी पालक, शिक्षकांकडून होत होती.

- Advertisement -

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांच्या पाठोपाठ दोन लस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली होती. आतापर्यंत ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि लसीकरणाला 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी पास देण्यात येत होता. मात्र, यापुढे रेल्वे प्रशासनाने 18 वर्षांखालील मुलांना लस देण्यास अद्याप परवानगी दिली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाता यावे यासाठी त्यांना रेल्वे तिकीट देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यासंदर्भातील परिपत्रक रेल्वे प्रशासनाकडून काढण्यात आले आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

वैद्यकीय आवश्यकता असलेल्यांनाही परवानगी
18 वर्षांखालील मुलांना प्रवासाच्या वेळी ओळखपत्र सोबत बाळगावे लागेल. यासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या सूचनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने या मुलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना वैद्यकीय कारणास्तव लस घेऊ नये, असा डॉक्टरांनी सल्ला दिला असेल, अशा व्यक्तींनी सोबत डॉक्टरांचे योग्य प्रमाणपत्र ठेवणे आवश्यक आहे. डॉक्टरांचे प्रमाणपत्र दाखवल्यास त्यांनाही रेल्वेचे तिकीट मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -