घरमुंबईअभिजीत बॅनर्जी यांच्यापूर्वी 'यां'नाही मिळालंय अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक!

अभिजीत बॅनर्जी यांच्यापूर्वी ‘यां’नाही मिळालंय अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक!

Subscribe

कल्याणकारी अर्थशास्त्र, सामाजिक निवडीचा सिद्धांत तसेच दारिद्र्याच्या प्रश्नावर केलेल्या संशोधनाबद्दल अमर्त्य सेन यांना १९९८ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

आज अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. यंदा भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? यापूर्वीसुद्धा एका भारतीयाने अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार पटकावला आहे. त्या भारतीयाचे नाव आहे अमर्त्य सेन. कल्याणकारी अर्थशास्त्र, सामाजिक निवडीचा सिद्धांत तसेच दारिद्र्याच्या प्रश्नावर केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना १९९८ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

कोण आहेत अमर्त्य सेन?

सेन यांचा जन्म शांतीनिकेतन येथे एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबात आशुतोष व अमिता या दाम्पत्यापोटी झाला. त्यांचे मातुल आजोबा क्षितिमोहन हे विश्वभारतीत संस्कृत व भारतीय संस्कृती हे विषय शिकवीत असत. वडील आशुतोष हे डाक्का विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. सेन यांनी डाक्का येथील सेंट ग्रेगरी स्कूलमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेऊन पुढे विश्वभारतीत इंटरपर्यंतचे शिक्षण घेतले आणि १९५३ मध्ये कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी. ए. झाले. नंतर ते इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेले. १९५५ मध्ये ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजमधून त्यांनी अर्थशास्त्र विषयात बी. ए. व १९५९ मध्ये एम. ए. ह्या पदव्या आणि डॉक्टरेट प्राप्त केली. पुढे १९५८ – ६३ या काळात ते ट्रिनिटी कॉलेजमध्ये अधिछात्र होते. १९५५ – ५८ या काळात त्यांनी जादवपूर विद्यापीठ व १९६३ – ७१ या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अध्यापन केले. नंतर १९७१-७७ या काळात त्यांनी इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि १९७७ – ८८ या काळात ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे अध्यापन केले. अर्थशास्त्राबरोबरच त्यांनी तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास केला. त्यांनी १९८८ – ९८ या काळात अमेरिकेतील हार्व्हर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांचे अध्यापन केले. त्यांची १९९८ – २००४ या काळापर्यंत ‘मास्टर ऑफ ट्रिनिटी कॉलेज’ या पदावर नियुक्ती झाली. या पदावर काम करणारे ते पहिले भारतीय होत. त्यानंतर हार्व्हर्ड येथे लॅमाँट युनिव्हर्सिटीत प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केले.

- Advertisement -

संशोधकांना प्रेरणादायी

अर्थशास्त्रीय धोरणांचे समाजाच्या हितावर काय परिणाम होतात, त्या धोरणांचे मूल्यमापन करणे हे कल्याणकारी अर्थशास्त्राचे उद्दिष्ट होय. त्यांनी १९७० मध्ये लिहिलेल्या आपल्या कलेक्टिव्ह चॉइस अँड सोशल वेल्फेअर ह्या आपल्या ग्रंथात व्यक्तींचे हक्क, बहुसंख्याकांचे शासन आणि व्यक्तीच्या स्थितिगतीबाबतच्या माहितीची उपलब्धता ह्यांसारख्या प्रश्नांचा परामर्श घेतला आहे. ह्यांतून संशोधकांना अशा प्रश्नांचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.

‘युनायटेड नेशन्स ह्यूमन इंडेक्स’ या प्रणालीचे जनक

सेन यांनी समाजातील दारिद्याचे व कल्याणाचे निर्देशांक निश्चित केले. हे निर्देशांक पुढील दोन कारणांसाठी महत्त्वाचे ठरतात : पहिले, देशातल्या वेगवेगळ्या समाजगटांत दारिद्याचे प्रमाण किती आहे; त्याचे विभाजन कसे आहे; त्यांत वेळोवेळी कसे आणि कोणते बदल झाले आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. दुसरे, देशातले दारिद्र्याचे प्रमाण आणि आर्थिक कल्याणाचे प्रमाण ह्यांच्या तुलनेसाठीही हे निर्देशांक महत्त्वाचे ठरतात. त्यांनी १९९० मध्ये देशांची क्रमवारी ठरविण्यासाठी तेथील लोकांचे आयुर्मान, शिक्षण व उत्पन्न यांवर आधारित ‘युनायटेड नेशन्स ह्यूमन इंडेक्स’ ही प्रणाली विकसित केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -