घरमुंबईकुख्यात गुंड प्रसाद पुजारीच्या मावस भावाला मोक्कांतर्गत अटक

कुख्यात गुंड प्रसाद पुजारीच्या मावस भावाला मोक्कांतर्गत अटक

Subscribe

बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी

विक्रोळीतील एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी सुरेशकुमार लक्ष्मण सुवर्णा (28) या आरोपीस मोक्का कायद्यांतर्गत गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सुरेशकुमार हा अंडरवर्ल्ड प्रसाद पुजारीचा मावस भाऊ असून अटकेनंतर त्याला मोक्का कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत सुनिल नारायण आंगणे या आरोपीस पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत नंतर मोक्का कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. यातील तक्रारदार बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे एक कार्यालय विक्रोळी परिसरात आहे.

दोन वर्षांपूर्वी त्यांचे विक्रोळी परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरु होते. यावेळी त्यांना एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन प्रसाद पुजारीचा व्हॉटअप मॅसेज आला होता. त्यात त्यांना खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. या मॅसेजनंतर प्रसादने त्यांना व्हॉट्अप कॉल केला होता, मात्र भीतीपोटी त्यांनी हा कॉल घेतला नाही. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मोबाईलवरुन कॉल येत होते, परंतु त्यांनी ते कॉल घेतले नाही. 30 जानेवारीला दुपारी अडीच वाजता त्यांच्या कार्यालयात सुनिल आंगणे आला होता. सुनिल हा याच परिसरात राहत असून त्यांच्या परिचित होता.

- Advertisement -

यावेळी त्याने त्यांच्याकडे त्यांच्या व्यवसायाविषयी विचारणा केल्यानंतर त्याला प्रसाद पुजारीने त्यांच्याकडे पाठविल्याचे सांगितले. तसेच प्रसादला फोन कर असे सांगून त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्याचा फोन घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना सायंकाळी घरी असताना प्रसाद पुजारीने फोन केला होता. त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली, मात्र तो त्याच्या परिसरात राहत असल्याने त्याने केवळ दहा लाख रुपयांची व्यवस्था करावी असे सांगितले. तसेच टोकन मनी म्हणून एक लाख रुपये दोन दिवसांत देण्यास सांगितले. डिसेंबर महिन्यात प्रसाद पुजारीने शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर ते प्रचंड भयभीत झाले होते, त्यातच त्यांना प्रसादकडून सतत दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी येत होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांत खंडणीसाठी धमकी येत असल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच सुनिल आंगणे याला पोलिसांनी अटक केली होती.

या गुन्ह्यांत प्रसाद पुजारीसह सुरेश सुवर्णा यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते, यातील सुरेशकुमार हा प्रसाद पुजारीचा मावस भाऊ असून तो कर्नाटक येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या पथकातील संतोष मस्तुद, महेंद्र दोरकर, नागनाथ जाधव यांनी कर्नाटक येथील उडपी, शिरवाच्या सुवर्णा निलया हाऊसमधून सुरेशकुमार सुवर्णा याला अटक केली. तपासात त्याच्या बँक खात्यात प्रसाद पुजारीने काही रक्कम जमा केली होती. त्यानेही इतर बँक खात्यात खंडणीची रक्कम जमा केल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला मोक्का कोर्टाने 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -