घरमुंबई‘खासदारांनी पूरग्रस्तांना साधा बिस्कीटचा पुडा तरी दिला का’

‘खासदारांनी पूरग्रस्तांना साधा बिस्कीटचा पुडा तरी दिला का’

Subscribe

बदलापूर शहरात आलेल्या पूरपरिस्थिती नंतर सोमवारी झालेल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेने भाजपाला टीकेचे लक्ष्य केले. एवढी पूरपरिस्थिती असताना स्थानिक खासदार 48 तासात बदलापुरात फिरकले नाहीत, असा आरोप करून माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला.

कुळगाव बदलापूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातल्या पूर परिस्थितीचे या सभेत तीव्र पडसाद उमटतील अशी आशा होती. त्यानुसार सभा सुरू होताच पूर परिस्थितीवरून प्रशासनाला धारेवर धरण्यास सुरुवात झाली. या सभेत वामन म्हात्रे यांनी भाजपाच्या नगरसेविका मीनल धुळे, निशा घोरपडे आदींनी पूरपरिस्थितीत नागरिकांना मदत देण्याचे चांगले काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. मात्र ‘खासदारांनी साधा बिस्किटचा पुडा तरी दिला का,’ अशा शब्दांत वामन म्हात्रे यांनी खासदार कपिल पाटील यांच्यावर टिका केली. स्थानिक खासदार कपिल पाटील पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतरच्या 48 तासात बदलापुरात फिरकले नाही, अशीही टीका यावेळी म्हात्रे यांनी केली. त्यावर भाजपाचे संजय भोईर यांनी खासदार आमच्यापेक्षा म्हात्रे यांच्या अधिक जवळचे असल्याचे सांगत त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. बदलापुरात पूरपरिस्थिती का निर्माण झाली, भुयारी गटार योजना का पूर्ण झाली नाही, असे सवाल उपस्थित करत म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांनी याबाबत लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली. त्यामुळे सभागृहात काही वेळ राजकीय हल्ले प्रतिहल्ले होताना दिसत होते.

- Advertisement -

पूरपरिस्थितीनंतर अनेक नगरसेवक नागरिकांना मदत करताना दिसत होते.त्यामुळे या सभेत उपस्थित राहून नगरसेवक पूरग्रस्त नागरिकांना जास्तीत जास्त व तात्काळ मदत कशी उपलब्ध करून देता येईल, यासाठी आवाज उठवतील, अशी अपेक्षा होती. परंतु भाजपाचे अवघे सहा नगरसेवक या सभेला उपस्थित होते. तर शिवसेनेच्याही काही नगरसेवकांनी सभेला दांडी मारली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -