घरमुंबईराज ठाकरेंचे आरोप खोडून काढण्यासाठी आता भाजपा नेत्यांमध्येच चढाओढ

राज ठाकरेंचे आरोप खोडून काढण्यासाठी आता भाजपा नेत्यांमध्येच चढाओढ

Subscribe

'ए लाव रे तो व्हिडिओ...' हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका वाक्यानी महाराष्ट्रातील नाही तर दिल्लीतील भाजपचे नेतेही धास्तावले आहेत.

‘ए लाव रे तो व्हिडिओ…’ राज ठाकरे यांच्या या एका वाक्याने महाराष्ट्रातील नाही तर दिल्लीतीलही भाजपा नेते धास्तावले आहेत. महाराष्ट्रामध्ये जाहीर सभांमधून सरकारची व्हिडिओद्वारे पोलखोल करणाऱ्या राज ठाकरे यांची धडकी भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना भरली असून, आता राज ठाकरेंनी केलेल्या आरोपाचे मुद्दे कसे खोडून काढता येईल यासाठी भाजपाचा प्रत्येक नेता कामाला लागला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि भाजपाचे प्रवक्ते देखील सध्या याच कामाला लागले आहेत. त्याचे कारण म्हणजे सगळ्यात आधी जो नेता राज ठाकरे यांचा मुद्दा स्ट्रॉंगपणे शोधून काढेल आणि राज ठाकरे यांच्या या झंजावाताला रोखेल त्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ जाता येईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मी जरी लोकसभा निवडणुकीत उमेदवार उतरवले नसले तरी मोदी आणि शहा या जोडगोळीला राजकारणाच्या पटलावरून हद्दपार करण्यासाठी राज्यभर सभा घेणार’, असे सांगत राज्यात सभांचा धडाका लावला. राज यांच्या प्रत्येक संभामध्ये त्यांनी ‘ए लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत अक्षरशः भाजपाला जेरीस आणले. राज यांच्या याच भाषणाची दखल आता दिल्लीत देखील घेतली आहे. दिल्लीतूनही मुख्यमंत्री कार्यालयावर राज ठाकरे यांना रोखण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे समजत आहे.

मुख्यमंत्र्यांनी अनेक मोठमोठ्या वकिलांची आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक घेतली आहे. जवळपास तीन ते चार तास ही बैठक चालली. यामध्ये विषय एकच होता तो म्हणजे राज ठाकरे यांच्या सभा कशा थांबवायच्या. तसेच त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल करून राज ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेता येईल.

–अभिजित पानसे, मनसे नेते

राज यांच्या सभा रोखण्यासाठी वकिलांची फौजही तैनात

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील सभा कशा रोखता येतील यासाठी भाजपा सर्व पद्धतीचा वापर करत आहेत. तसेच राज यांच्या सभांना परवानगी मिळू नये म्हणून वकिलांची फौजही तैनात करण्यात आल्याचा आरोप आता मनसेकडून होत आहे. एवढेच नाही तर पत्रकरांना माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मनसेच्या पदाधिकारी साड्या चोरतानाचा व्हिडिओ एडिट करून टाकण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणावर मुख्यमंत्री बारीक लक्ष ठेवत असून, राज ठाकरेंची जुनी भाषणे शोधण्यासाठी देखील अनेकांना कामाला लावल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

भाजपाची सोशल मीडिया टीमही लागली कामाला

भाजपाच्या सोशल मीडिया टीमला तर थेट आदेशच देण्यात आले आहेत की, इतर नेत्यांच्या सभांपेक्षा फक्त आणि फक्त राज यांच्या सभेवर लक्ष देऊन त्याला उत्तर कसे देता येईल याचे नियोजन करा. त्यामुळेच सध्या भाजपाची सोशल मीडिया टीम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा कुठे आहे याची माहिती घेऊन, त्यानंतर ही टीम पुढची रणनीती ठरवते. तसेच राज ठाकरे यांनी याआधी त्यांच्या भाषणातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केलेल्या जुन्या क्लिप्स शोधून ते एडिट करून त्या सर्वत्र फिरवण्याचे काम भाजपाकडून सुरू आहे. यासाठी भाजपाच्या सोशल मीडियाच्या टीमने बरीच नवीन मुले कामासाठी घेतली आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ‘पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र’ या भाजपाच्या फेसबुक पेजवरून राज ठाकरेंवर टीका करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री जाहीर सभेत तर तावडेंचे पत्रकार परिषदेत ‘राज’ना उत्तर

राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभेत उत्तर देत आहेत तर शिक्षणमंत्री आणि मीडिया सेलचे प्रमुख विनोद तावडे हे माध्यमांशी संवाद साधून राज ठाकरेंना बारामतीकडून स्क्रिप्ट येत असल्याचा आरोप करत आहेत. मात्र, आपल्या जाहीर सभेत रोज काहीतरी वेगळा व्हिडिओ दाखवून राज ठाकरे पोलखोल करत असल्यामूळे भाजपाच्या सर्वच नेत्यांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता कायद्याच्या आधारे राज ठाकरे यांच्या इतर सभा कशा रोखता येईल यासाठी भाजपाचे नेते कामाला लागले आहेत.

राज ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याचा सरकारचा डाव आहे हा मनसेकडून करण्यात आलेला आरोप धादांत खोटा आहे. विनाकारण खोटेनाटे आरोप पसरवून हौतात्म्य आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण राज ठाकरे यांचे एक मत पडले तर मोठा फरक पडणार नाही.

-विनोद तावडे, शिक्षण मंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -