Bmc budget 2023 : कोणतीही करवाढ न करता अर्थसंकल्पातून मुंबई महापालिका देणार दिलासा?

सकाळी साडेदहा वाजता अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे या शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प प्रशासक इकबाल सिंग चहल यांना सादर करतील आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर करतील

मुंबईः मुंबई महापालिकेचा वर्ष 2023-24चा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, प्रशासक आणि आयुक्त इकबाल चहल हे 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता महापालिका मुख्यालयातील सभागृहात सादर करणार आहेत. तसेच सकाळी साडेदहा वाजता अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे या शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प प्रशासक इकबाल सिंग चहल यांना सादर करतील आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर करतील. त्यानंतर प्रशासक आणि आयुक्त इकबाल सिंग चहल अर्थसंकल्प सभागृहात मांडतील. आगामी सार्वत्रिक निवडणूक पाहता कोणत्याही प्रकारची करवाढ आणि दरवाढ न करणारा हा अंदाजित अर्थसंकल्प असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

खरं तर सामान्यांकडून रुग्णालयातील केस पेपरसाठी आकारले जाणारे दहा रुपये आणि इतर चाचण्यांसाठी वसूल केले जाणारे प्रति नमुना 50 ते 100 रुपयांच्या शुल्कातूनही अर्थसंकल्पात सूट मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य खात्यातर्फे मुलुंड एम. टी. अगरवाल रुग्णालय बांधून तयार होत असल्याने यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद होण्याची शक्यता आहे. तसेच गोवंडी रुग्णालय, कुपर रुग्णालय, नायर रुग्णालय, वांद्रे भाभा, शीव रुग्णालय आदी रुग्णालयांची कामेही 2023 मध्ये पूर्णत्वात जाण्याची शक्यता असल्यानं त्यासाठी आरोग्य खात्याच्या निधीतही जवळपास तीन ते साडेतीन कोटींच्या वाढीची तरतूद करण्याचा अंदाज आहे.

महापालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडचे काम जवळपास 60 टक्के पूर्ण झालेय. त्यामुळे येत्या वर्षात तो पूर्ण होण्यासाठी जवळपास पाच ते साडे पाच हजार कोटींची तरतूद होण्याची शक्यता आहे. तसेच वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्पासाठी 800 ते 1000 कोटी, मिठी नदी प्रकल्पासाठी अडीच ते तीन कोटी, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी 1305 कोटींची तरतूद केला जाण्याचा अंदाज आहे. तसेच क्रॉफर्ड मार्केटचे कामही पूर्ण करण्यासाठी 150 ते 200 कोटींची तरतूद करण्याचा अंदाज आहे. मुंबईत एस. व्ही. रोड कोरा केंद्रचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तसेच राम मंदिर रोडपासून वाढीव पुलाचे काम, तेली गल्ली, विद्याविहार आणि विक्रोळी रेल्वे पुलावरील बांधकाम, डिलाईड रोडवरील पूल आदींचं काम जोरदार सुरू आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील सात रस्ता जंक्शन ते डॉ. ई. मोझेस रोड यांना जोडणाऱ्या पुलाच्या कामांसह गोखले पूल, गोरेगाव येथील खाडीपुलाच्या बांधकामासाठी जवळपास दीड ते दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.

पवई ते घाटकोपर तसेच अमर महल ते सदाकांत ढवण मैदान आदी जलबोगदा प्रकल्पासाठी 800 ते 900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येण्याची शक्यता आहे. कचरा प्रकल्प राबवण्यासाठीही येत्या वर्षात 900 ते 1000 कोटी रुपयांची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. तसेच महसुली उत्पन्न कमी होत असले तरी जीएसटीची 12 टक्क्यांवरून 18 टक्के झाल्याने यावरील वाढलेला खर्च तसेच इतर प्रकल्पही पूर्णत्वास येत असताना त्यावरील खर्च वाढला जात असल्याने येत्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. म्हणून भांडवली खर्च सुमारे 22 ते 24 हजार कोटींपर्यंत वाढवला जाऊ शकतो. तसेच कर्जाच्या आधारे मूळ अर्थसंकल्पाचा आकार 49 हजार कोटींपर्यंत वाढवला जाण्याचा अंदाज आहे.

खरं तर मुंबई महापालिकेत तब्बल 36 वर्षांनी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रशासक म्हणून नेमणूक केल्यानंतर ते प्रथम प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर करणार आहेत. एप्रिल 1984 मध्ये द. म. सुखथणकर यांची मुंबई महापालिकेत पहिले प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर पुढे 12 नोव्हेंबर 1984 ते 09 मे 1985 या कालावधीत जे. जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. त्याचदरम्यान फेब्रुवारी 1985 मध्ये जे. जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून अर्थसंकल्प मांडला होता. जे. जी. कांगा यांच्यानंतर तब्बल 38 वर्षांनी चहल हे प्रशासक म्हणून अर्थसंकल्प मांडणार आहेत. मुंबई महापालिकेची 7 मार्च 2022 रोजी मुदत संपली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर आयुक्तांच्या रूपाने प्रशासक आहेत. तसेच आगामी महापालिका निवडणूक एप्रिल किंवा जास्तीत जास्त ऑक्टोबरपर्यंत होऊ शकतो. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर जरी इकबाल सिंग चहल यांची छाप असली तरी शिंदे-फडणवीस सरकार अर्थसंकल्पातून मुंबईकरांना दिलासा देण्याची शक्यता आहे.


हेही वाचाः प्रशासक म्हणून इक्बाल सिंग चहल पहिल्यांदाच मांडणार अर्थसंकल्प, मुंबईकरांना काय मिळणार?