घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

पुत्रातें इच्छी कुळ | तयाचें कायि हेंचि फळ | जे निर्दळिजे केवळ | गोत्र आपुलें //
कुळांत पुत्रप्राप्तीची इच्छा करितात, त्याचे हेच का फळ, की पुत्राने आपल्या गोत्रजांचा संहार करावा !
हें मनींचि केविं धरिजे । आपण वज्राचेयां होईजे। वरी घडे तरी कीजे। भलें इयां //
आपले मन त्यांजविषयी वज्राप्रमाणे कठोर करण्याचे मनात तरी कसे आणावे? त्यांचे आपल्या हातून होईल तेवढे बरेच करावे.
आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें। हें जीवितही उपकारावें। काजीं यांच्या //
आम्ही जे जे मिळवावे, त्या सर्वांचा त्यांनी उपभोग घ्यावा; इतकेच नव्हे, तर त्यांच्याकरिता आम्ही आपले जीवितही अर्पण करावे.
आम्ही दिगंतीचे भूपाळ। विभांडूनि सकळ। मग संतोषविजे कुळ | आपुलें जें //
आम्ही देशोदेशींचे राजे जिंकावे व त्यायोगे आपल्या कुळास संतोषित करावे.
तेचि हे समस्त | परी कैसें कर्म विपरीत !। जे जाहले असती उद्यत | झुंजावया //
पण कर्माची किती विपरीत गती आहे, की तेच हे आमचे सर्व गोत्रज आम्हांबरोबर युद्ध करण्यास उद्युक्त झाले आहेत!
अंतौरिया कुमरें। सांडोनिया भांडारें। शस्त्राग्रीं जिव्हारें आरोपुनी //
बायका, मुले व धन या सर्वांस सोडून तलवारीच्या धारेवर ज्यांनी आपले जीव ठेविले आहेत,
ऐसियांतें कैसेनि मारूं? | कवणावरी शस्त्र धरूं? । निजहृदया करूं। घातु केवीं? //
अशांना मी कसे मारू, कोणावर शस्त्र धरू आणि मी आपल्याच जीवलगांचा कसा घात करूं?
हें नेणसी तूं कवण | परी पैल भीष्म द्रोण। जयांचे उपकार असाधारण | आम्हां बहुत //
हे कोण आहेत हे तुला माहीत नाही काय? ते पाहा पलीकडे भीष्य व द्रोण आहेत. त्यांचे आमच्यावर असंख्य व असाधारण उपकार झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -