घरमुंबईठाण्याप्रमाणेच मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक बिनविरोध?

ठाण्याप्रमाणेच मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक बिनविरोध?

Subscribe

ठाणे महानगर पालिकेप्रमाणेच मुंबई महानगर पालिकेच्या महापौरांची निवडणूक देखील बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिकेच्या महापौरपदी एकमेव शिवसेनेचे नरेश म्हस्के यांचा उमेदवार अर्ज आल्याने तेथील महापौरपदाची निवड बिनविरोध झाल्याने मुंबई महापालिकेतही महापौरपदाची निवड बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली आहे. भाजपने एक पाऊल मागे टाकत शिवसेनेप्रती सहानुभूती निर्माण करण्याचा घेतलेला पावित्रा आणि काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न पाहता ठाण्याप्रमाणेच मुंबईच्या महापौरांची निवड बिनविरोध होण्याची चिन्हे दिसत आहे. मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक येत्या २२ नोव्हेंबर रोजी होत असून त्यासाठी सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. सध्या शिवसेनेकडून विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे नाव आघाडीवर असून त्यांनी महापौरपदाची निवडणूक होण्यापूर्वी स्थायी समितीची एक नियमित आणि एक तहकूब सभा बोलावली आहे. बुधवारी होणारी बैठक त्यांनी सोमवारी बोलावली आहे. तर गुरुवारी तहकूब सभा बोलावली आहे. त्यामुळे यशवंत जाधव यांचे महापौरपदासाठी नाव निश्चित झाल्याची खात्री पटत आहे.

भाजपची काँग्रेसला सर्व जागांची ऑफर!

युती तोडल्याची अप्रत्यक्ष घोषणा शिवसेनेने केल्यानंतरही भाजप शिवसेनेची सहानभूती मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मवाळ भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने आक्रमक होण्याची रणनीती तयार केली होती. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाठिंबाही मागितला होता. परंतु त्यांनी पाठिंबा देण्यास नकार दिल्यामुळे, काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने मतदान करत शिवसेनेला शह देण्याचा निर्धार भाजपने केला होता. परंतु दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. यासाठी भाजपच्या वाट्याची सर्व पदे त्यांना देण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे. परंतु, राज्यातील सत्ता समीकरणे जुळत नसल्याने, या पक्षांचा महापालिकेतही घोडा अडलेला आहे. तरीही सत्ता समीकरण जुळवण्याच्या प्रयत्नात शिवसेना पुढे असल्याने भाजपने आता यातून माघार घेतली असल्याचे समजते.

- Advertisement -

…तर निवडणूक बिनविरोध

दरम्यान, महापालिकेच्या सर्व नगरसेवकांची बैठक मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह पार पडली. यावेळी महापौरपदाच्या निवडणुकीत कोणती भूमिका घ्यावी? यावर चर्चा करण्यात आली. परंतु, विरेाधी पक्षनेते रवी राजा यांनी एकमुखी ठराव करत दिल्ली हायकमांड आणि मुंबई अध्यक्ष जो निर्णय घेईल त्याप्रमाणे अंमल केला जाईल, असा शब्द दिला. त्यामुळे काँग्रेसची भूमिका ही पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर अवलंबून असून सोमवारी दुपारी होणाऱ्या बैठकीतच उमेदवार द्यावा की न द्यावा याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसला आपल्याकडे वळवण्यात जर शिवसेना यशस्वी झाली आणि भाजपची सध्या उमेदवार न देण्याची भूमिका लक्षात घेतली तर ही निवडणूक ठाण्याप्रमाणेच बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – मनसे-राष्ट्रवादीचे महापालिका निवडणुकीत नवे समीकरणं जुळणार?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -