घरताज्या घडामोडीBMC : पावसाळ्यात मुंबईची तुंबई न होण्यासाठी पालिकेची तयारी सुरू; आयुक्तांचे अधिकाऱ्यांना...

BMC : पावसाळ्यात मुंबईची तुंबई न होण्यासाठी पालिकेची तयारी सुरू; आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Subscribe

पावसाळ्यात मुंबईत सखल भागात कुठेही पाणी साचून रस्ते, रेल्वे वाहतुकीवर विपरीत परिणाम होणार नाही आणि मुंबईकरांना त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच, पावसाळयात आपत्कालिन घटना हाताळण्यासाठी भारतीय नौदल, मुंबई महापालिका आपत्कालीन यंत्रणा, अग्निशमन दल, एनडीआरएफ पथके अशा सर्व प्रकारच्या यंत्रणा सज्ज ठेवण्याचे व त्यांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावे, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

मुंबई : पावसाळ्यात मुंबईत सखल भागात कुठेही पाणी साचून रस्ते, रेल्वे वाहतुकीवर विपरीत परिणाम होणार नाही आणि मुंबईकरांना त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच, पावसाळयात आपत्कालिन घटना हाताळण्यासाठी भारतीय नौदल, मुंबई महापालिका आपत्कालीन यंत्रणा, अग्निशमन दल, एनडीआरएफ पथके अशा सर्व प्रकारच्या यंत्रणा सज्ज ठेवण्याचे व त्यांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावे, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. (BMC Preparations of the municipality to prevent flooding of Mumbai during monsoon Commissioner instructions by the authorities)

यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध यंत्रणांमध्ये सुयोग्य समन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्‍यक्षतेखाली बुधवारी महापालिका मुख्यालय येथे बैठक पार पडली.

- Advertisement -

सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यास आपत्तीवर मात करणे शक्य

मुंबईतील विविध यंत्रणांनी पावसाळ्याच्या काळात सखल भागातील पाणी साचण्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सज्ज रहावे. अशा स्थितीचा सामना करण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेसह मुंबईतील सर्व यंत्रणांची आहे. पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय राखून योगदान दिल्यास कोणतीही आव्हानात्मक स्थिती एकत्रित प्रयत्नाने टाळता येईल. सर्व यंत्रणांनी पावसाळापूर्व कामांमध्ये चोख भूमिका बजावावी, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सर्व यंत्रणांना केले.

- Advertisement -

481 ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप

जोरदार पावसाच्या काळात सखल भागांमध्ये पाणी उपसा करणारे पंप लावले जातात. यंदादेखील शहर आणि उपनगरात मिळून 481 ठिकाणी पंप लावण्यात येणार आहेत. त्‍यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करावा. एखादा पंप जर वेळेत व योग्य प्रकारे कार्यरत झाला नाही, तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त गगराणी यांनी दिले.

उपनगरीय रेल्वे सेवा सुरू ठेवण्यासाठी काळजी घ्या

रेल्वे आणि मुंबई महापालिकेने गतवर्षीच्या पावसाळ्यात अतिशय उत्तम समन्वय साधून कामकाज केल्याने उपनगरीय रेल्वे सेवा अव्याहतपणे सुरू होती. रेल्वे हद्दीमध्ये मायक्रो टनेलिंग आणि कलव्हर्टच्या स्वच्छतेची कामे चांगली झाल्यानेच हे शक्य झाले. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा संथ गतीने निचरा होणाऱया ठिकाणी भूमिगत जल – साठवण टाक्यांची उभारणी केली. यंदाही त्याच धर्तीवर उत्तम समन्वयाने सर्व कामे करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच, रेल्‍वेमध्‍ये सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा सज्‍ज ठेवावी. रेल्वे परिसरातील वृक्ष छाटणी मोहीम मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी उद्यान विभागाला दिल्या

25 विभाग पातळीवर नियंत्रण कक्ष

मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात 25 विभाग पातळीवर नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. हे समर्पित नियंत्रण कक्ष सर्व उपकरणांसह सुसज्‍ज ठेवावेत, अशा सूचना महापालिका आयुक्त गगराणी यांनी दिल्या.

दरडी कोसळण्याच्या ठिकाणी उपाययोजना

मुंबईत पूर्व उपनगरांमध्ये, पवई, कांजूरमार्ग, भांडूप, मुलुंड, मालाड आदी ठिकाणी पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा सर्व याठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचे काम विविध यंत्रणांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर योग्य समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच, डोंगरमाथा, डोंगरउतारावर राहणा-या रहिवाशांना नोटीस बजवाव्‍यात व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना द्याव्यात. त्‍यांना आपत्तीसमयीचे प्रशिक्षण द्यावे, असे निर्देशदेखील आयुक्‍त यांनी दिले.

राडारोडा उचलणे व रस्‍ते वाहतूक सुरळीत ठेवणे

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील विविध कामे आणि मेट्रो रेल्वे इत्यादी प्रकल्पांच्या ठिकाणी कोणताही राडारोडा पडून राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित यंत्रणेने घ्यावी. प्रत्येक विभागातील सहायक आयुक्तांनी आपल्या विभागातील राडारोडा काढण्यासाठीचा समन्वय त्या-त्या यंत्रणेशी साधावा. तसेच, वाहतूक पूर्ववत होण्‍याकामी, स्थानिक कामे झाल्‍यावर बॅरिकेड्स काढावीत, याबाबतची माहिती संबंधित यंत्रणांना द्यावी, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांची देखभाल काटेकोरपणे करणे

मुंबई पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवरील देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारी मुंबई महापालिकेकडे आहे. त्यामुळे दोन्ही द्रुतगती मार्ग सुस्थितीत असावेत, याची खबरदारी मध्यवर्ती यंत्रणेसह सहायक आयुक्‍त आणि उप आयुक्तांनी घ्यावी. द्रुतगती मार्गावर कामाची देखरेख विभागीय पातळीवर काटेकोरपणे व्हावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

एनडीआरएफ, भारतीय नौदल, अग्निशमन दलाला सज्ज राहण्याच्या सूचना

या बैठकीला उपस्थित असणाऱया राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एनडीआरएफ) अधिकाऱ्यांनी पावसाळ्याच्या तयारीबाबत माहिती देताना सांगितले की, मुंबईत आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यासाठी एनडीआरएफचे 3 पथक सज्ज असणार आहेत. तर पूर्व उपनगरासाठी अतिरिक्त पथक तैनात ठेवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त गगराणी यांनी दिल्या. भारतीय नौदलालाही त्यांची पथके आणि पाणबुडे (डायव्हर्स) यासह सुसज्ज राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. अग्निशमन दलानेही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिले.


हेही वाचा – Mumbai : मालमत्ताधारकांनो २५ मे पूर्वी करभरणा करा दंडात्मक कारवाई टाळा : महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -