घरमुंबईप्लॅटफॉर्मवर खाऊ आणायला निघालेली मुले रेल्वेरुळामध्ये अडकली

प्लॅटफॉर्मवर खाऊ आणायला निघालेली मुले रेल्वेरुळामध्ये अडकली

Subscribe

आरपीएफ जवानांच्या तत्परतेने वाचली

शाळेतील मधल्या सुट्टीत खाऊच्या आशेने तीन शाळकरी मुले थेट रेल्वे फलाटामध्ये उतरली. मात्र त्यानंतर पुन्हा प्लॅटफॉर्मवर चढणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे ही मुले खूप घाबरली. त्याचवेळी मुलांच्या दिशेने लोकल येत असताना प्लॅटफॉर्मवर गोंधळ उडाला. त्या क्षणी प्रसंगावधान राखून भायखळा आरपीएफ जवानांनी तातडीने त्या तीन मुलांचे प्राण वाचवले. ही सर्व मुले १२ ते १३ वर्षांची होती.

बुधवारी दुपारच्या सुमारास ही तिन्ही मुले मधल्या सुट्टीत खाऊ आणायच्या निमित्ताने शाळेतून बाहेर पडली होती. शिक्षकांच्या नजरा चुकवून या मुलांनी थेट रेल्वे स्टेशन गाठले. रेल्वे स्टेशनवरच्या स्टॅाल्सवर चांगले खाऊ मिळतात, असे त्यांना कुणीतरी सांगितले होते, म्हणून ही मुले कोणाच्याही लक्षात येणार नाही, याची खबरदारी घेत गुपचूप शाळेतून बाहेर पडली. भायखळा रेल्वे स्टेशनवर पोहोचताच प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी या मुलांना पुलाचा वापर न करता थेट रेल्वे रुळ ओलांडायचा प्रयत्न केला. रेल्वे रुळ ओलांडताना फलाटावर चढता न आल्याने घाबरलेल्या मुलांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. इतक्यात त्यांच्या दिशेने लोकल येताना दिसल्याने रेल्वे स्टेशनमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आरपीएफ जवानांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी रेल्वे रुळावर धाव घेवून या भेदरलेल्या मुलांना फलाटावर चढवायला सुरुवात केली.

- Advertisement -

भायखळा आरपीएफचे जवान अमित कुमार यांनी तातडीने प्रसंगावधान दाखवल्यामुळे या तिन्ही मुलांना सुखरुप रेल्वे फलाटावर चढवले. अब्दुल मनन (१२ वर्षे), झाईद गिन्नी (१३ वर्षे), अनस इस्लाम (१३ वर्षे) अशी या तिन्ही मुलांची नावे असून ही सर्व मुले इयत्ता आठवीच्या वर्गात शिकतात. भायखळामधील ह्यूम शाळेत ही मुले शिकतात. मुलांच्या आई-वडिलांना आणि ह्यूम हायस्कूलच्या प्राचार्यांना बोलावून आरपीएफ जवानांनी ही मूले त्यांच्या स्वाधीन केली. शाळेतल्या शिक्षकांना मुले बाहेर गेल्याची कल्पना नसल्यामुळे मुलांच्या पालकांनी शाळेत गोंधळ घातला. मुलांचे काही बरे-वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -