घरमुंबईफटाक्यांच्या बाजारात चिनी ड्रॅगन कायम

फटाक्यांच्या बाजारात चिनी ड्रॅगन कायम

Subscribe

परवान्याच्या प्रतिक्षेत अनेक विक्रेते गॅसवर

मुंबई:-अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या सणासाठी मुंबईसह देशभरातील बाजारपेठ सज्ज झाली आहे. यात प्रामुख्याने फटाके विक्रेत्यांवर सगळ्यांच्या नजरा आहेत. यात अनेक वेगवेगळे फटाके सध्या मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. ज्यात चीनी फटक्यांचा सर्वाधिक समावेश आहे. गेल्यावर्षी मुंबई आणि देशभरात चिनी फटाक्यांना झालेल्या विरोधानंतरही यंदा चिनी फटक्यांनी आतापासूनच बाजारात एंट्री केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्यावर्षी झालेला विरोध यंदाही कायम राहणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत. मुख्य म्हणजे लालबाग, परळ आणि दादरसारख्या विभागात फटाक्यांची विक्री करणार्‍या हजारो विक्रेत्यांना अद्याप विक्रीचे परवाने न मिळाल्याने त्यांच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मुंबईसह देशभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. या दिवाळीसाठी मुंबईतील दादर, लालबाग, भुलेश्वर आणि इतर बाजारपेठ सजली आहे. यात फटाके खरेदीसाठी मुंबईकरांची आतापासून गर्दी होऊ लागल्याचे चित्र महम्मद अली रोडवर दिसून येते आहे. फटकांच्यासंदर्भात कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिल्याने फटाके विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पण मुंबईतील रहिवासी क्षेत्रात असलेल्या फटाके विक्रेत्यांवर सध्या चिंतेचे ढग पसरले आहे. येथील अनेक फटाके विक्रेत्यांना अद्याप पालिकेकडून परवानगी मिळालेली नाही. यातील अनेक विक्रेते हे गेल्या ३० ते ४० वर्षांपासून फटाक्यांची विक्री करत असून यांना पालिकेकडून परवाने देण्यात आलेले नाहीत.

- Advertisement -

राज्य सरकारकतर्फे गेल्या दोन वर्षांपासून निवासी क्षेत्रात फटाके विक्री करण्यास मनाई केली होती. त्याच पार्श्वभूमीवर यंदाही अनेक विक्रेत्यांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. पण यातील बहुतांश सर्वच विक्रेत्यांकडून लाखो रुपयांचे फटाके आणून ठेवले असल्याने त्यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती परळमधील एका विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. यासंदर्भात त्या विक्रेत्याने सांगितले की, दरवर्षीप्रमाणे आम्ही फटाके विक्री करतो. यासाठी मी साधारणपणे दोन ते चार लाखांचा माल घाऊक बाजारातून विक्रीसाठी आणला आहे. परंतु अद्याप पालिकेने परवानगी न दिल्याने आम्हांला दुकान सुरु करण्यास उशीर होत आहे. जर येत्या आठवड्यात परवानगी दिली नाही तर मोठं नुकसान सहन करावे लागणार आहे. तर येत्या आठवड्यात परवानगी न दिल्यास त्याशिवायच दुकान सुरु करण्याचा इशारा या विक्रेत्यांकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्यावषीं भारत आणि चीनमध्ये झालेल्या वादामुळे फटाके विक्रीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. अनेक घाऊक विक्रेत्यांप्रमाणेच ग्राहकांनी देखील चिनी फटाक्यांना नापसंती दर्शविली होती. त्यामुळे यंदा काय चित्र असेल याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र यंदा मोठ्या प्रमाणात बाजारात चिनी फटाके दाखल झाली असल्याची मोठ्या विक्रेत्यांकडून माहिती देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने उंच आकाशात जाऊन वेगवेगळ्या रंगाची उधळण करणार्‍या फटाक्यांचा समावेश आहेत. तर सध्या बाजारात गुलाबी भुईचक्र नव्याने दाखल झाले असून याला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे. तर साधारणपणे २५० कोटींची उलाढाल फटाके विक्रीत होणार असल्याचा अंदाज या विक्रेत्याकडून वर्तविण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -