घरमुंबईक्लीनअप मार्शलकडून नागरिकांची लूटमार सुरूच!

क्लीनअप मार्शलकडून नागरिकांची लूटमार सुरूच!

Subscribe

शहरात अस्वच्छता पसरविणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडून क्लीनअप मार्शलची नेमणूक करण्यात आली होती. मात्र मार्शलकडून जनतेची लुबाडणूक होत असल्याने महासभेने नेमणूकीचा ठराव रद्द केला होता. मात्र महासभेने ठराव करूनही क्लीनअप मार्शलकडून लुटमार थांबवलेली नाही. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे महासभेच्या निर्णयालाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याचेच दिसून येत आहे.

उघड्यावर शौचास बसणे, कचरा टाकणे, रस्त्यावर थुंकणे यावर वॉच ठेवण्यासाठी महापालिकेकडून प्रत्येक प्रभाग समिती स्तरावर क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी महासभेची मंजूरी घेण्यात आली होती. खासगी कंत्राटदाराकडून शहरात २४५ क्लीनअप मार्शल नेमण्यात आले होते. रेल्वे स्टेशन परिसर बस स्टॉप आणि शहरातील मोक्याच्या ठिकाणी हे क्लीनअप मार्शल तैनात असत. विशेषत: पान टपरीच्या शेजारीच हे उभे असलेल्या पाहावयास मिळत आहेत. तंबाखूची अथवा पानाची पिचकारी रस्त्यावर मारणारे, जळती सिगारेट रस्त्यावर फेकणारे, रस्त्यावर थुंकणारे या सर्वांकडून हे क्लीनअप मार्शल दंड वसूल करत आहेत. १००, १५० आणि २०० रुपये अशी दंडाच्या रकमेची पावती होती. एका क्लीनअप मार्शला पाच पावती फाडण्याची सक्ती होती. मात्र काही दिवसानंतर क्लीनअप मार्शलकडून अक्षरश: पाचशे ते हजार रूपये दंड उकळले जाऊ लागले.

- Advertisement -

रेल्वे स्थानकातून अथवा बस स्थानकातून बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना गाठून त्यांच्याकडून पाचशे ते हजार रूपये दंड वसूल करण्याचे प्रकार घडू लागले. त्यांना पावतीही दिली जात नसे. क्लीनअप मार्शलकडून स्वच्छतेच्या नावाखाली दमदाटी करून बिनधास्तपणे नागरिकांची लुटमार केली जात असे. यासंदर्भातील अनेक तक्रारी नगरसेवकांकडे आल्या होत्या. महासभेतही हा विषयी चांगलाच गाजला होता. खासगी कंत्राटदार असल्याने त्या मार्शलवर खासगी कंत्राटदाराचे नियंत्रण होते. पालिका अधिकार्‍यांचे कोणतेच नियंत्रण नव्हते. मात्र लुटमारीत काही पालिका अधिकार्‍यांचाही वाटा असल्याचे बोलले जाऊ लागले. त्यामुळे प्रशाासनाकडूनही कानाडोळा केला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर नागरिकांची लुटमार थांबवण्यासाठी महासभेने हा ठराव रद्द केला गेला. मात्र महासभेने ठराव रद्द करूनही क्लीनअप मार्शल जागोजागी दिसून येत आहेत. त्यांची लुटमार अजूनही थांबलेली नाही. जे नागरिक अनभिज्ञ आहेत, त्यांची लुटमार सुरूच आहे. त्यामुळे बेकायदेशीपणे नागरिकांना छळणार्‍या क्लीनअप मार्शलवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तर सर्वपक्षीय नगरसेवकांनी आक्षेप घेतल्याने महासभेत क्लीअप मार्शलचा ठराव रद्द करण्यात आला आहे. या ठरावानुसारच कंत्राटदाराला नोटीस देऊन काम थांबवण्याची कार्यवाही सुरू आहे, असे प्रशासनातील एका अधिकार्‍याने सांगितले आहे.

मागील महासभेत क्लीनअप मार्शलचा ठराव रद्द करण्यात आला असून तो अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. क्लीनअप मार्शलकडून लुटमार सुरूच असेल तर त्याची दखल घेऊन प्रशासनाला सांगण्यात येईल.
– मिनाक्षी शिंदे, महापौर, ठाणे महापालिका

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -