घरमुंबई'एकदा होऊनच जाऊ दे', मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना चॅलेंज!

‘एकदा होऊनच जाऊ दे’, मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना चॅलेंज!

Subscribe

'आम्ही ४ वर्षांहून कमी कालावधीत काय केले याची आकडेवारी सांगू, त्यामुळे १५ वर्षांत तुम्ही कशी जनतेची फसवणूक केली? हे देखील जनतेला कळू द्या', अशी टिकाच मुख्यमंत्र्यांनी यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा शंखनाद भाजपाने फुंकला असून, विरोधकांना थेट ‘एका व्यासपीठावर’ येण्याचे आव्हानच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीने आमच्यासोबत एका व्यासपीठावर यावे आणि त्यांनी १५ वर्षांत काय केले, हे सांगावे’, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी देत ‘आम्ही ४ वर्षांहून कमी कालावधीत काय केले याची आकडेवारी सांगू, त्यामुळे १५ वर्षांत तुम्ही कशी जनतेची फसवणूक केली? हे देखील जनतेला कळू द्या’, अशी टिकाच मुख्यमंत्र्यांनी यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली. तसेच ‘महागठबंधन होवो, अथवा महामहागठबंधन, आपल्याला त्याची पर्वा नाही, लोकांचे मत विकासाला असेल, ते भाजपालाच असेल’, असा आत्मविश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला. दोन दिवसीय महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या बैठकीचा समारोप गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने झाला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी वाचला विकासकामांचा पाढा

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा सरकारने केलेल्या विकास कामांचा पाढा वाचत स्वतःची पाठ थोपटून घेतली. सुमारे ३० हजार किमीपेक्षा जास्त लांबीचे रस्ते आपल्या सरकारने ग्रामीण भागात तयार केल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. त्यासोबतच जागतिक बँकेचा चमू जेव्हा महाराष्ट्राच्या भेटीवर आला, तेव्हा त्यांनी सांगितले की, केवळ ०.०२ टक्क्यांचा अपवाद वगळता हे सर्व रस्ते अतिशय चांगले तयार झाले आहेत. म्हणजेच ९९.९८ टक्के रस्त्यांच्या गुणवत्तेवर त्यांनी शिक्कामोर्तब केल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

- Advertisement -

अवघ्या ४ वर्षांत १३ लाख हेक्टर सिंचन

२०१४ पर्यंत केवळ ३२ लाख हेक्टर इतके सिंचन होते. मात्र, भाजपा सरकारने अवघ्या ४ वर्षांत १३ लाख हेक्टरची त्यात भर घातल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. विशेष म्हणजे कोणताही सिंचन प्रकल्प हाती घेण्यापूर्वी आवश्यक जागेचे अधिग्रहण करण्याचे धोरण सरकारने पत्करले नाही. त्यामुळे प्रकल्पांच्या किंमती वाढणार नाहीत, हे सरकारने आधीच सुनिश्चित केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासोबत सिंचनासाठी ३० हजार कोटी रुपये सरकारने खर्च केल्याचे सांगत आणखी ३० हजार कोटी केंद्राकडे मागितल्याचे त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – मराठ्यांनो, नोकऱ्या देणारे बना, मागणारे नाही

- Advertisement -

शिक्षणात राज्य तिसऱ्या क्रमांकावर

आधी शिक्षणात महाराष्ट्राचा १८ वा नंबर होता होता. मात्र आता आम्ही राज्याला तिसर्‍या क्रमांकावर आणल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. तसेच शुल्क नियमन प्राधिकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आणि सरकारची ३००० कोटी रूपयांची बचतही राज्य सरकारने केल्याचे त्यांनी नमूद केले. अल्पसंख्याक समुदायासाठी खूप काही केल्याचा डांगोरा आधीच्या सरकारने पिटला. पण अल्पसंख्यकांच्या महिला बचत गटांसाठी राज्य सरकारने जो निधी उपलब्ध करून दिला, तो पूर्वीच्या सरकारपेक्षा ४००० टक्क्यांनी अधिक आहे. याला म्हणतात ‘सबका साथ सबका विकास’, असे सांगत त्यांनी आघाडीवर जोरदार टीका केली.

त्याचसोबत मराठा समाजासाठी आपल्या सरकारने अनेक निर्णय घेतले. पण, यापूर्वीच्या सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे काम थंडबस्त्यात ठेवल्याचा आरोप करत या महामंडळाला पूर्वीच्या सरकारने निधी दिला असता, तर मराठा समाजात रोजगारावरून असंतोष निर्माण झाला नसता, अशी टीका देखील त्यांनी केली.


हेही वाचा – मुख्यमंत्री ब्राम्हण आहेत, पंचांग बघूनच मंत्रीमंडळ विस्तार करतील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -