घरमुंबईरखडलेल्या विकासकामांचा आयुक्तांनी घेतला आढावा

रखडलेल्या विकासकामांचा आयुक्तांनी घेतला आढावा

Subscribe

कंत्राटदारांसह विभागप्रमुख तसेच खाते प्रमुखांची आढावा बैठक प्रविणसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत पार पडली

मुंबईतील अनेक विकास कामांची कंत्राटे मंजूर झाल्यानंतरही ती वेळेत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे रखडलेल्या सर्व विकासकामांचा आढावा महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी घेतली. यावेळी कंत्राटदार आणि खातेप्रमुख व अधिकार्‍यांना समोरा समोर बसवून त्यांची शाळाच घेतली. यावेळी ज्या कंत्राट कामांना विलंब का होत आहे, तशीच त्याची कारणे काय आहेत? हे जाणून घेत जिल्हाधिकारी, पोलीस, वाहतूक पोलीस तसेच म्हाडा आदी प्राधिकरणांशी जिथल्या तिथेच दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांनी ‘नायका’ची भूमिका बजावली.

हेही वाचा – बेस्टच्या अनुदानासाठी कर्मचार्‍यांच्या पैशाला हात

मुंबई महापालकेच्यावतीने इमारत बांधकाम, उद्यानांचे बांधकाम, नाला रुंदीकरण, रस्ते बांधणी, मल जल प्रक्रिया केंद्र आदी विकास कामांसाठी कंत्राटे मंजूर केली आहे. यामध्ये ज्या कंत्राटदारांना ५० कोटींहून अधिक कामांची कंत्राटे दिली आहेत. त्या कंत्राटदारांसह विभागप्रमुख तसेच खाते प्रमुखांची आढावा बैठक प्रविणसिंह परदेशी यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे, डॉ. अश्विनी जोशी तसेच आबासाहेब जर्‍हाड आदींसह अधिकारी उपस्थित होते. तब्बल पाच ते सहा तास ही बैठक चालली होती. महापालिका आयुक्तांनी अशाप्रकारे कंत्राटदार आणि अधिकार्‍यांना समोरासमोर बसवून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा हा पहिलाच प्रकार असून या बैठकीमुळे कंत्राटदारांमध्ये एकप्रकारचे समाधानाचे वातावरण पसरले आहे. प्रत्येक खात्यांची तसेच विभागांची स्वतंत्र बैठक घेऊन आयुक्तांनी संबंधित कंत्राटदार आणि प्रमुखांकडून रखडलेल्या कामांची कारणे जाणून घेतली. ज्या-ज्या ठिकाणी इतर प्राधिकरणांच्या संबंधित प्रकरण असल्यास तात्काळ दूरध्वनी करून त्यांना तशाप्रकारच्या सूचना केल्या गेल्या. त्यामुळे यापुढे खातेप्रमुख व कंत्राटदारांनी समस्या न सांगता त्वरीत या विकासकामांना गती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिल्याचे समजते.

- Advertisement -

रस्त्यांचे बॉटलनेक काढण्याचे निर्देश

मुंबईतील अनेक रस्त्यांवर दुकानांमुळे बॉटलनेक तयार झाले आहेत. परिणामी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे ही दुकाने त्वरीत हटवून पात्र दुकानदारांचे महापालिकेच्या धोरणानुसार पुनर्वसन करा किंवा त्यांना त्या बांधकामांचे पैसे द्या. परंतु ही कामे युद्धपातळीवर व्हायला हवी, असे निर्देश देतानाच रस्त्याच्या कडेला होणार्‍या युटीलिटीजच्या खोदकामांच्या ठिकाणी पेव्हरब्लॉकचा वापर करण्याच्याही सूचना परदेशी यांनी केल्या आहेत.

आयुक्त ‘नायक’च्या भूमिकेत

प्रविणसिंह परदेशी यांनी या बैठकीसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व अधिकार्‍यांना तसेच कंत्राटदारांना एक दिवसाचा मुख्यमंत्री बनलेल्या अनिल कपूर यांच्या ‘नायक’ चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या. ‘नायक’ चित्रपटात ज्या प्रमाणे अनिल कपूर यांनी शंकेचे निरसन आणि समस्या ऑन दी स्पॉट सोडवण्याचा प्रयत्न केला होता, त्याचप्रमाणे परदेशी हे कंत्राटदार आणि खातेप्रमुखांच्या बैठकीत वावरताना दिसल्याने सर्वांच्या मुखी आज आयुक्त हे ‘नायक’ झाले होते, असे ऐकायला मिळत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -