घरमुंबईकोपरी पुलाचा पहिला टप्पा पाच महिन्यांत पूर्ण करा

कोपरी पुलाचा पहिला टप्पा पाच महिन्यांत पूर्ण करा

Subscribe

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

कोपरी पुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम मे, २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे नगरविकास आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रेल्वे आणि एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांना दिले. त्यासाठी मनुष्यबळ आणि कामाचा वेग वाढवा, रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करा, असे बजावण्यात आले आहे. या कामामुळे होणारी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांची रुंदी वाढवा, मुंबई महापालिकेच्या बंद जकात नाक्याच्या जागेतून पर्यायी मार्गिका सुरू करा आणि शक्य असेल तिथे मुख्य रस्त्यांवरील दुभाजक हटवून रस्याची रुंदी वाढवा, अशा उपाययोजनाही शिंदे यांनी यावेळी सुचविल्या आहेत.

कोपरी पुलाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्याच्या प्रवेशद्वारापाशीच मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. त्याची गंभीर दखल घेत राज्याचे नगरविकास आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात सर्व संबंधित विभागांची बैठक बोलावली होती. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंते विनय सुर्वे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे आदी अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

नव्याने उभारण्यात येणार्‍या कोपरी पुलाच्या पायलिंगचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलाच्या स्लीप गर्डरचे काम पालघर येथे सुरू आहे. फेब्रुवारी महिनाअखेर पायलिंगचे काम पूर्ण होईल. त्यानंतर पुढील अडीच महिन्यांत गर्डर्सचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर अस्तित्वातील जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूंना नव्याने उभारल्या जाणार्‍या या पुलांवरून वाहतूक सुरू करणे शक्य होणार आहे. त्यानंतर जुना पूल पाडून त्या ठिकाणी मे, २०२१ अखेरपर्यंत नव्या पुलाची उभारणी केली जाईल. त्यानंतर या मार्गावरून आठ पदरी वाहतूक सुरू होईल, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. हे काम करताना वाहतूक पोलिसांकडून आवश्यक परवानग्यांबाबत सहकार्य मिळाले तर कामाचा वेग वाढवता येईल, असे मत रेल्वे आणि एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी यावेळी मांडले. त्यानंतर शिंदे यांनी ठाण्याचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) अमित काळे यांना फोन करून आवश्यक असलेल्या परवानग्या तातडीने देण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या बंद जकात नाक्याची काही जागा मिळाली तर तिथून पर्यायी मार्गिका सुरू करणे शक्य आहे. शिंदे यांनी त्याबाबतच्या सूचना दिल्यानंतर ही जागा तातडीने उपलब्ध करून दिली जाईल, असे प्रवीण दराडे यांनी स्पष्ट केले.

सर्वंकष आराखड्यासाठी बैठका
भविष्यात या ठिकाणी नवे रेल्वे स्टेशन उभारले जाणार आहे. त्यामुळे तीन हात नाक्यावरील वाहतुकीची वर्दळ वाढेल. ही वाहतूक सुरळीत पद्धतीने व्हावी, यासाठी ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग व पर्यायी रस्त्यांचे जाळे निर्माण करणे क्रमप्राप्त आहे. त्याची रुपरेषा ठरविण्यासाठी आणि संभाव्य अडथळ्यांवर कशी मात करता येईल, यासाठी एमएमआरडीएसह मुंबई आणि ठाणे महापालिका अधिकार्‍यांनी संयुक्त बैठका घेऊन सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यानुसार जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या बैठकांना सुरुवात होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -