घरमुंबईडोंबिवलीत नागरी वस्तीत धाबा: रहिवाशी त्रस्त

डोंबिवलीत नागरी वस्तीत धाबा: रहिवाशी त्रस्त

Subscribe

या अनधिकृत धाब्यावर त्वरीत कारवाई करावी यासाठी स्थानिक नगरसेवकाने पालिकेत तक्रार केली आहे.

डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्रनगरमधील भरवस्तीत अनधिकृतपणे धाबा सुरू करण्यात आला असून हा धाबा मध्यरात्री अडीच पर्यंत सुरु असतो. तसेच धाब्यावर सर्रासपणे दारुच्या पार्टया होत असतात. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. भरवस्तीत असणाऱ्या या अनधिकृत धाब्यावर त्वरीत कारवाई करावी, अन्यथा कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा जबाबदार राहील. अशी तक्रार वजा सुचना शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक वामन म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे.

दारुड्यांचा नागरिकांना त्रास

डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ५१ महाराष्ट्रनगर परिसरातील म्हात्रे वाडी परिसरात असलेल्या नागरी वस्तीत गेल्या दोन महिन्यांपासून अनधिकृतपणे धाबा सुरु करण्यात आला आहे. सायंकाळी सात वाजता धाबा सुरु होतो तो मध्यरात्री अडीच पर्यंत सुरु असतो. धाब्यावर दारु पिणारे यांच्यात आपसात भांडणेही होत असतात. तसेच वेस्टेज अन्न हे उघडयावर टाकले जातात. त्यामुळे आजूबाजूला कुत्र्यांचा वावर खूपच झाला आहे. या परिसरात कुत्री झुंडीच्या झुंडीने वावरत असतात. त्यामुळे याठिकाणाहून नागरिकांना चालणेही मुश्किल होते.

- Advertisement -

कुत्र्यांचा हैदोस

कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याचे प्रकारही घडले आहेत. नगरसेवक म्हात्रे यांच्या पायाचा लचकाही तिथल्या कुत्रयाने घेतला आहे. त्यामुळे त्यांनी रेबीजचे इंजेक्शन घेऊनही त्यांची जखम बरी झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने या प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे असे म्हात्रे यांचे म्हणणे आहे. या अनधिकृत धाब्या विषयी नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना त्रासदायक ठरणारा नागरी वस्तीतील धाब्यावर आणि तिथल्या मोकाट कुत्र्यांवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -