घरमुंबईडोंबिवलीत पेव्हर ब्लॉकच्या कामात गैरव्यवहार ?

डोंबिवलीत पेव्हर ब्लॉकच्या कामात गैरव्यवहार ?

Subscribe

पालिका अभियंत्यांची विभागीय चौकशी होणार,

 डोंबिवली विभागातील प्रभाग क्र. ७३ मध्ये पेव्हर ब्लॉक बसविताना मंजूर कामाशिवाय परस्पर दुसर्‍या ठिकाणी काम केल्याचे पालिकेच्या शहर अभियंत्यांच्या अहवालातच निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी संबधित पालिका अभियंत्यांच्या विभागीय चौकशीला मंजुरी मिळावी यासाठी महासभेपुढे प्रस्ताव सादर केला आहे. महासभेच्या मंजुरीनंतर पालिका अभियंत्यांची चौकशी होणार आहे.

डोंबिवली विभागातील प्रभाग क्र. ७३ नवागाव, आनंदनगर- ठाकूरवाडी परिसरातील प्रदीप सोसायटी ते शिवाजी पार्क सोसायटीपर्यंत रस्ता तयार करून पायवाटा बनविणे आणि पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामात पालिका अधिकारी, ठेकेदार आणि नगरसेवक यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याची आरोपवजा तक्रार माजी विरोधी पक्षनेते रमेश म्हात्रे यांनी ठाणे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. ज्या ठिकाणी कामे मंजुर करण्यात आली. त्या कामाचा प्रशासकीय आदेश काढण्यात आला. मात्र प्रत्यक्षात दुसर्‍याच ठिकाणी ही कामे करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. खासगी गृहनिर्माण संस्था अथवा खासगी इमारतीच्या कंपाऊंडमध्ये पेव्हर ब्लॉकची कामे करता येत नाहीत. मात्र कल्याण – डोंबिवलीत ७० टक्के पेव्हर ब्लॉकची कामे नियमबाह्य करण्यात आली आहेत. शासकीय निधीचा गैरवापर करून नगरसेवकांनी मतांसाठीच ही कामे केलेली आहेत, असा आरोपही म्हात्रे यांनी केला आहे.

- Advertisement -

म्हात्रे यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पालिकेच्या शहर अभियंत्यांकडून अहवालात मागविण्यात आला होता. त्यानंतर अहवालातही दुसरीकडे काम केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात बाजारपेठ पोलिसांनीही म्हात्रे यांचा जबाब पंचनामा घेतला आहे.

तत्कालीन शहर अभियंता पी. के. उगले (सेवानिवृत्त), तत्कालीन कार्यकारी अभियंता परवेझ तडवी (सेवानिवृत्त), उपअभियंता बबन बरफ आणि कनिष्ठ अभियंता महेश गुप्ते यांनी संगनमताने मंजूर कामाच्या ठिकाणाव्यतिरिक्त परस्पर अन्य ठिकाणी काम केले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या संदर्भात कामाचे देयक सुध्दा महापालिकेकडून अदा झालेले आहे. या प्रकरणी संबधित अभियंत्यांनी कर्तव्यात निष्काळजीपणा करून गैरवर्तन केल्याने त्यांची विभागीय चौकशी होणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीचा प्रस्ताव आयुक्तांनी महासभेच्या पटलावर ठेवला आहे.

- Advertisement -

काय आहे अहवालात ?

सदर प्रकरणी शहर अभियंता यांनी ११ ऑक्टोबर २०१८ रोजी सादर केलेल्या अहवालात सदर सोसायटी पायवाटा बनविणे व पेव्हर ब्लॉक बसविणे या प्रस्तावास तत्कालीन आयुक्तांनी प्रशासकीय मंजुरी दिली होती. सदर कामाचे ई टेंडरींग पध्दतीने निविदा मागविण्यात येऊन न्युनतम दराच्या निविदेस वित्तीय मंजुरी दिलेली आहे. सदर कामाचा कार्यादेश १० मार्च २०१५ रोजी देण्यात आला होता. तथापि प्रत्यक्ष काम प्रदीप सोसायटी ते शिवाजी पार्क सोसायटी या ठिकाणी करण्याऐवजी ते पुनर्वसू व चामुंडा सोसायटी येथे करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे कामाचे देयकसुध्दा अदा करण्यात आलेले आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -