घरमुंबईबबलिंगने अडविले हजारो निकाल

बबलिंगने अडविले हजारो निकाल

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांच्या निकालासाठी सध्या परीक्षा व मूल्यमापन विभागात जय्यत तयारी सुरु आहे. मात्र बबलिंगच्या समस्येमुळे परीक्षा विभागाची झोप उडाली असून यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल लावायचे कसे, अशी नवी समस्या परीक्षा विभागाला भेडसावत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांच्या निकालासाठी सध्या परीक्षा व मूल्यमापन विभागात जय्यत तयारी सुरु आहे. मात्र बबलिंगच्या समस्येमुळे परीक्षा विभागाची झोप उडाली असून यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल लावायचे कसे, अशी नवी समस्या परीक्षा विभागाला भेडसावत आहे. यात प्रामुख्याने आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालात अनेक बबलिंगची प्रकरणे समोर आली असून या विद्यार्थ्यांचा शोध घेण्याची नवी मोहीम विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाला सुरु करावी लागली आहे.

बबलिंगच्या समस्येने परीक्षा विभाग हैराण

मुंबई विद्यापीठाने गेल्यावर्षीपासून सरसकट सर्व अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन हे ऑनलाइन पध्दतीने करायचा निर्णय घेतला होता. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे गेल्यावर्षी विद्यापीठाला निकालाच्या आणीबाणीला सामेेरे जावे लागले होते. अनेक विद्यार्थ्यांना सहा ते सात महिने निकालापासून वंचित रहावे लागले होते. ऑनलाइन असेसमेंट प्रक्रियेतील गोंधळ, त्रुटी आणि बबलिंगच्या प्रकारामुळे निकाल रखडले होते. त्यामुळे या समस्या पुन्हा भेडसावू नये म्हणून यंदा ऑनलाइन प्रक्रियेत अनेक बदल केेले. मात्र त्यानंतरही यंदा बबलिंगच्या समस्या भेडसावित असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करायचे कसे असा प्रश्न समोर आला आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांनी कानाडोळा केल्याने बबलिंगचे प्रकार घडले

दरम्यान, यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी निकाल जाहीर न झाल्याने न्यायालयातदेखील धाव घेतली होती. या विद्यार्थ्यांच्या निकालात देखील बबलिंगची समस्या समोर आली असून म्हणूनच त्यांचे निकाल रखडल्याची माहिती समोर आली आहे. बबलिंगच्या या प्रश्नामुळे विद्यापीठात निकालाचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर हा प्रकार घडू नये म्हणून विद्यापीठाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर ही प्रकार घडल्याने विद्यापीठासमोर नवी डोकेदुखी ठरली आहे. यासंदर्भात उत्तरपत्रिकेवर क्रमांक कसे लिहावे अशी माहिती देणारे व्हिडीओ विद्यापीठाने युट्यूबवर देखील अपलोड केले होते. ज्याची माहिती सर्व प्राचार्यांना देण्यात आली होती. मात्र याकडे ही विद्यार्थ्यांनी कानाडोळा केल्याने बबलिंगचे प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

बबलिंग म्हणजे नेमके काय?

विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेवर आपले बैठक क्रमांक लिहिण्यासाठी एक रकाना दिला जातो. या रकान्यात शून्य ते नऊ असे गोल देण्यात येतात. विद्यार्थ्यांंचा जो बैठक क्रमांक असेल त्या क्रमाकांवरील गोल ठळक करायचा असतो. उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करताना हे गोल स्कॅन करुन त्यांच्या बैठक क्रमांक ओळखला जातो. मात्र हजारो विद्यार्थ्यांनी बैठक क्रमांकानुसार असलेला गोल ठळक न करता इतर गोल ठळक केल्याने त्यांचा चुकीचा बैठक क्रमांक ऑनलाइन मूल्यांकनाच्या प्रक्रियेत नमूद करण्यात येते. हा चुकीचा नमूद झालेला बैठक क्रमांक बबलिंग म्हणून ओळखला जातो. या बबलिंगमुळे ही उत्तरपत्रिका नेमकी कोणाची आहे, हे समजण्यात अडचणी येत असल्याने त्यांचे निकाल जाहीर करण्यात अडचण येते.

- Advertisement -

काय आहेत उपाययोजना

बबलिंगचे प्रकार थांबविण्यासाठी उत्तरपत्रिकेत बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय परीक्षा व मूल्यमापन विभागाने घेतला आहे. त्यानुसार नव्या उत्तरपत्रिका छापण्यात आल्या असून येत्या शैक्षणिक वर्षांपासून या उत्तरपत्रिका वापरात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या नव्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांची माहिती छापून येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

हे प्रकार थांबविण्यासाठी प्राध्यापकांच्या मदतीने अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या होता. मात्र त्यानंतरही या केसस पुढे आल्या आहेत. यावर पर्याय म्हणून आम्ही उत्तरपत्रिकेत बदल करण्याचा निर्णय घेतला असून येत्या शैक्षणिक वर्षांपासून या नव्या उत्तरपत्रिका वापरात आणण्यात येणार आहे.
– डॉ. अर्जुन घाटुळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -