घरमुंबईअधिकार्‍यांमुळे आंबेडकर भवनाचे काम रखडले

अधिकार्‍यांमुळे आंबेडकर भवनाचे काम रखडले

Subscribe

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात पाण्याचा नळ व इतर सुविधा तात्काळ देण्यात याव्यात, असे पत्र देऊनही प्रशासनाकडून कोणत्याही सुखसुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. आयुक्तांनी आदेश देऊनही प्रशासन अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने आम्ही त्यांचा निषेध करणार आहोत, असे यावेळी शिवसेना नगरसेवक संजू वाडे यांनी सांगितले. गेल्या सहा वर्षांपासून भवनाचे काम सुरू असून त्यात अनेक अडचणी आल्या. त्यामुळे त्याचे काम रखडले आहे. अधिकार्‍यांनी जर याकडे काटेकोरपणे लक्ष दिले असते तर आजमितीला मोठ्या दिमाखात भवन उभे असते. मात्र तसे न झाल्याने भवनाचे काम पूर्ण व्हायला अजूनही दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो असे वाडे यांनी सांगितले.

ऐरोलीतील महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम वाढीव मुदत उलटूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. भवनासाठी आर्थिक निधीची तरतूद असतानाही प्रशासन अधिकार्‍यांच्या उदासीन कारभारामुळे काम रखडले आहे. ६ डिसेंबर जवळ येऊन ठेपले असताना काम अपूर्णच असल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी भवनाच्या कामाची पाहणी करत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले होते. वारंवार अंतर्गत आराखड्यात बदल करण्यात आल्याने काम लांबतच गेले.

- Advertisement -

सोमवारी या ठिकाणी रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे यांनी आपल्या शेकडो सहकार्‍यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना बसायलाही जागा नसल्याचे आढळून आल्याने यावर त्यांनी वाडे यांच्याशी चर्चा केली. नवी मुंबई, मुंबईसह इतर शहरातून नागरिक या ठिकाणी हजेरी लावणार असल्याने संजू वाडे यांनी भवन परिसरात पाण्याची सोय, मंडप तसेच इतर सुविधा तत्काळ पुरवण्यात याव्यात असे निवेदन मनपा आयुक्त रामास्वामी एन.यांना दिले. सदर निवेदनावर तात्काळ कार्यवाही करावी, असे आदेश आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिले असतानाही अधिकार्‍यांनी त्यावर अंमलबजावणी केली नाही. साधा पाण्याचा नळही बसवला नाही, असे यावेळी वाडे यांनी सांगितले.

सन २०११ मध्ये डॉ. आंबेडकर भवन स्मारकाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले.१७ कोटींचे हे स्मारक २०१३ मध्ये पूर्ण होणार होते. मात्र हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. डोमच्या पिरॅमिड डिझाइनमुळे कंत्राटदाराला डोम कसा उभारावा, हेच उमजत नव्हते. त्यात या डोमला मार्बलचे आच्छादन बसविण्यासाठी आसुसलेल्या सत्ताधार्‍यांनी डोमच्या डिझाइनचा विचार न करता मार्बल बसविण्याचे कंत्राट देऊन टाकले.

- Advertisement -

गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेले भवनाचे काम आजमितीस पूर्ण होणे अपेक्षित होते. नुकताच आयुक्तांनी दुसर्‍या टप्प्यातील प्रस्ताव पास केल्याने आता या भवनाचे काम अंतिम टप्यात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी हजारोंच्या संख्येने येथे नागरिक येणार असून त्या ठिकाणी सुविधा तात्काळ देण्यात याव्यात असे पत्र देऊनही प्रशासनाकडून कोणत्याही सुखसुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे आम्ही याचा निषेध करणार आहोत

-संजू वाडे, नगरसेवक, शिवसेना.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -