घरमुंबईअंगणातील मातीतून बाप्पाचं झाड

अंगणातील मातीतून बाप्पाचं झाड

Subscribe

मिट्टी फाऊंडेशनचा पर्यावरण स्नेही उपक्रम

लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे सात दिवस शिल्लक आहेत. हा उत्सव पर्यावरण पूरक व्हावा यासाठी शासकीय आणि महापालिकेची यंत्रणा प्रयत्नशील असतानाच त्यांना सामाजिक संस्थांचाही चांगला हातभार लागत आहे. पर्यावरण स्नेही उत्सवाच्या हेतूने लाल मातीची घरीच गणेशमूर्ती साकारण्यासाठी मिट्टी फाउंडेशनच्या वतीने अंगणातील माती हा उपक्रम राबविला जात आहे. या मातीचा उपयोग करत संस्थेच्या संकेतस्थळावरील माहितीद्वारे आपल्या आवडीप्रमाणे गणेशमूर्ती साकारली जाऊ शकते.
शिल्पकार मयूर मोरे यांच्या पुढाकारातून मिट्टी फाउंडेशनच्या माध्यमातून ‘अंगणातील माती’ हा उपक्रम राबविला जात आहे. अंगणातील माती या संकल्पनेतून घरच्या घरी पर्यावरण पूरक मातीचा गणपती बनवता येतो. या मूर्तीला रंगाची गरज नाही. मूर्तीला मातीचा सुगंध आहे. महत्वाची बाब म्हणजे ही मूर्ती घरच्या घरी कुंडीत विसर्जीत करता येते. मूर्ती घडवताना त्यात आपल्या आवडत्या रोपाच्या बिया यात टाकायच्या आणि आपल्याला सोडून गेलेल्या जवळच्या व्यक्तीच्या नावाने हे रोप कुंडीत वाढवायचे. या माध्यमातून सदैव त्याची आठवण सोबत ठेवायची.

महत्वाचे म्हणजे या ‘बाप्पाच्या झाडा’च्या उपक्रमातून गोदावरीसह उपनद्यांचे पावित्र आणि स्वच्छताही राखली जाणार आहे. पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने अधिकाधिक नागरिकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचावी यासाठी ‘बाप्पाचे झाड’ या लघुपटाचीदेखील निर्मिती करण्यात आली आहे. अभिनेते चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री ऋतुजा भार्गवे, राजेश पंडित यांच्यासह बालकलाकारांनी यात अभिनय केला आहे. लघुपट जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते प्रदर्शित झाला.

मिट्टी फाउंंडेशनच्या माध्यमातून गणेशमूर्ती साकारण्यासाठी नागरिकांना लाल माती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मूर्ती घडवण्यासाठी संस्थेच्य www.mittigroup.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून मार्गदर्शनदेखील केले जाते.- शिल्पकार मयूर मोरे, मिट्टी फाउंडेशन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -