घरमुंबईपनवेलमध्ये ईद मिलादुनबी रॅलीत फडकला तिरंगा

पनवेलमध्ये ईद मिलादुनबी रॅलीत फडकला तिरंगा

Subscribe

इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस पनवेलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. हजरत पीर जमाल शाह तजरी रह तक्का दर्गाह ट्रस्टच्यावतीने काढण्यात आलेल्या रॅलीत तिरंगा फडकवण्यात आला. त्यामुळे ही पनवेलमधली ईद आकर्षणाची ठरली.

अयोध्यातील ऐतिहासिक रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादासंदर्भात लागलेल्या निकालानंतर यंदाच्या ईद सणावर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पनवेलमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीत पारंपरिक पोशाखात आलेल्या तरूणांनी ‘हिंदुस्थान जिंदाबाद’ चे नारे लावत हिंदू-मुस्लीम एकतेच दर्शन घडवले. सणानिमित्त मुस्लीमबांधव घरी दुवापठण व फातिया पठण केले. खीर-पुरी व अन्य गोड पदार्थ करण्यात आले. मिरवणुकीत अबालवृद्धांसह हजारो मुस्लीम बांधव सहभागी झाले. हजरत पीर जमाल शाह तजरी रह तक्का दर्गाह ट्रस्टीच्यावतीने काढण्यात आलेली ही रॅली पनवेल रेल्वे स्थानकापासून पुढे आझाद नगर-के मॉल, गोदरेज कॉलनी, तक्का गाव परिसरातून काढून शेवटी तक्का दर्गा या मार्गावर संपवण्यात आली.

- Advertisement -

संपूर्ण देशात बाबरी मस्जिद आणि राम मंदिर निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही सर्व मुस्लीम बांधव आदर करतो व आम्हाला निर्णय मान्य आहे. तसेच आम्ही सर्व हिंदू मुस्लीम भाऊ-भाऊ आहोत. त्यामुळे प्रत्येक सण उत्सव आम्ही शहरात एकत्रित साजरे करतो, असेही मुस्लीम बांधव म्हणाले. तसेच या रॅलीदरम्यान मुस्लीम बांधवांनी झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव यांसारखे अनेक सामाजिक संदेश देखील दिले व शांततेच्या मार्गाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जावेद इब्राहिम फकीर मुजावर, सीजान जावेद फकीर मुजावर,भाजप अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव सय्यद अकबर यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -