घरमुंबईपुरामुळे कल्याणामध्ये शेकडो संसार उघडयावर; २६ जुलैची कटू आठवण

पुरामुळे कल्याणामध्ये शेकडो संसार उघडयावर; २६ जुलैची कटू आठवण

Subscribe

कल्याण आणि आसपासच्या परिसरामध्ये शनिवारी मुसळधार पाऊस पडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरात १० फुटांपर्यंत पाणी शिरलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं.

गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवलीत पूरस्थिती उद्भवली होती. कल्याणातील गोविंदवाडी, रेतीबंदर, घोलपनगर, वालधुनी आदी परिसरातील घरांमध्ये दहा फुटांपर्यत पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य, कपडे, टीव्ही, फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब झाल्या आहेत. तसेच अनेकांच्या भांडीकुंडी वाहून गेल्याने शेकडो लोकांचे संसार उघड्यावर पडले आहे. शनिवारची रात्र सभागृह अथवा शाळेत काढल्यानंतर रविवारी सकाळी रहिवाशी घरी परतल्यानंतर त्यांच्या डोळयात अश्रू तरळले. सामानाची नासधूस झाल्याने सामानांची सारवासारव करीत आहेत.

नैसर्गिक संकटातही शासकीय अधिकारी गायब!

शनिवारच्या मुसळधार पावसाने उल्हास नदीला पूर आला. त्यामुळे नदीचे पाणी शहरात घुसल्याने रस्त्यावर दहा ते वीस फुटांपर्यंत पाणी वाढले होते. बैठ्या चाळी पाण्याखाली गेल्या होत्या. सर्वाधिक फटका कल्याणातील गोविंदवाडी, रेतीबंदर, घोलपनगर, वालधुनी आदी परिसराला बसला होता. पाणी दहा ते वीस फुटांपर्यंत वाढल्याने अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतकार्याने अडकलेल्या शेकडो लोकांची सुटका करण्यात आली. शनिवारी दुपारीच या रहिवाशांना हलवण्यात आले होते. त्यामुळे नजीकच्या सभागृह आणि शाळा आदी ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली हेाती. रात्रीपर्यंत पाणी न ओसरल्याने लोकांनी शनिवारची रात्र तिथेच काढली. स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेत त्यांच्या जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था केली हेाती. मात्र, शासकीय यंत्रणा अथवा पालिकेचे पथक त्यांची विचारपूस करण्यासाठी फिरकले देखील नाही. त्यामुळे रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

- Advertisement -

आर्थिक मदतीची स्थानिकांना अपेक्षा

रविवारी पहाटे पाणी ओसरल्यानंतर रहिवाशी सकाळी आपल्या घरी परतले. त्यावेळी घरातील दशा पाहून त्यांच्या डोळयांत अश्रू तरळले. २६ जुलैच्या कटू आठवणी त्यामुळे जागवल्या. घरातील सर्वच वस्तू खराब झाल्या होत्या. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यानंतरही त्या ठिकाणी एकही शासकीय अधिकारी पंचनामा करण्यासाठी फिरकलेला नाही, अशी नाराजी रहिवाशांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या घरांचा शासकीय यंत्रणेकडून पंचनामा करून आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यकत केली आहे. तसेच शहरात साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. विविध आजारांचे रूग्ण वाढत आहेत. पूर परिस्थितीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेागराई पसरून आरोग्याला धोका निर्माण होण्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे पालिकेने तातडीने जंतूनाशक फवारणी आणि साफ सफाईचे काम हाती घ्यावे, अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


हेही वाचा – मुसळधार पावसामुळे नागरिकांची दैना; ठिकठिकाणी पाणी साचले!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -