घरमुंबईबेपत्ता नवऱ्याला शोधतो सांगून फकिरानं महिलेला गंडवलं!

बेपत्ता नवऱ्याला शोधतो सांगून फकिरानं महिलेला गंडवलं!

Subscribe

बेपत्ता झालेल्या नवऱ्याला परत आणतो असं सांगून एका फकिराने पवईमध्ये विवाहितेला फसवल्याची घटना समोर आली आहे. या महिलेचे दागिने फकिराने लांबवले असून त्याचा चेहरा परिसरातल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

फकीर भोंदू बाबांनी फसवल्याच्या अनेक तक्रारी आणि प्रकरणं आपण रोज ऐकतो. याबाबत अंनिससारख्या अनेक स्वयंसेवी संस्था जनजागृती देखील करतात. मात्र, तरीदेखील अशा घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत. आणि अगदी ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागांमध्येही असे प्रकार घडताना दिसत आहेत. पवईमध्ये नुकताच असा प्रकार उघड झाला असून बेपत्ता झालेल्या पतीला परत आणतो असं सांगत एका भोंदू फकीराने विवाहितेला लाखोंचा गंडा घातला आहे. तिचे सर्व दागिने घेऊन हा भोंदू फकीर फरार झाला आहे. सुनीता लोदी असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे. सीसीटीव्हीमध्ये या फकिराचा चेहरा कैद झाला असून त्या आधारावर पोलीस तपास करत आहेत.

हाताला चुना आणि गुलाबी रंगाचं पाणी!

झालं असं की सुनीताचे ४० वर्षीय पती रामाशिव हे १२ नोव्हेंबर रोजी रागाच्या भरात घर सोडून निघून गेले होते. पण तेव्हापासून ते बेपत्ताच आहेत. यासंदर्भात सुनीता शेजारणीशी बोलत असताना या भोंदू फकिराने हे सगळं ऐकून सुनीताला कारण विचारलं. सगळा प्रकार त्यांनी सांगितल्यानंतर फकिराने हातचलाखीने सुनीताच्या हातावर चुना लावून पाणी ओतलं आणि त्याचा रंग गुलाबी करून दाखवला. नंतर एक नारळ फोडून त्यातून लाल पाणी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्यांचे तुकडे काढून दाखवले. त्यामुळे सुनीताचा त्याच्यावर विश्वास बसला. यावर ‘तुझा पती दुसऱ्या बाईच्या नादी लागला आहे, त्याला आपण परत आणू, मी उद्या परत येतो’, असं सांगून हा फकीर तिथून निघून गेला.

- Advertisement -

कापडात मडकं, मडक्यात दागिने!

दुसऱ्या दिवशी बरोबर सांगितलेल्या वेळेला हा भोंदू फकीर सुनीताकडे आला. त्याने सुनीताला ४ खिळे देऊन घराच्या चारही कोपऱ्यामध्ये पेपरमध्ये गुंडाळून ठेवायला सांगितले. त्यावर तिला आणि तिच्या मुलाला गळ्यात घालायला एक ताईत दिला. आणि नंतर तिला एक मडकं आणायला सांगितलं. सुनीताच्या अंगावरचे सगळे दागिने त्या मडक्यात ठेवले आणि वरून पीठ टाकलं. नंतर ते मडकं एका कपड्याने गुंडाळून बांधलं आणि सुनीताला दिलं. ‘मडकं संध्याकाळी उघड, त्याआधी उघडलं तर नवरा आणि मुलाच्या जिवाला धोका आहे’, असंही सांगितलं. आणि तिथून तो निघून गेला. शिवाय जाताना ‘तुझा पती लवकरच घरी येईल, त्याला आल्यावर सोन्याचं पाणी पाज’, असं देखील बजावलं. सुनीता त्यानंतर नवऱ्याची आतुरतेनं वाट पाहायला लागली.


हेही वाचा – मूल पाहिजे, माझ्यासमोर सेक्स करा; भोंदूबाबा गजाआड

मडकं फुटलं आणि नशीबही!

संध्याकाळी फकिरानं सांगितल्याप्रमाणे सुनीताने मडकं उघडलं. पण आत हात घालताच तिला धक्काच बसला. मडक्यामध्ये दागिने नव्हतेच. तेव्हा कुठे सुनीताला आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे शेवटी सुनीताने पवई पोलीस स्टेशन गाठलं आणि भोंदू फकिराविरोधात तक्रार दाखल केली. या भोंदू फकीराचा चेहरा परिसरातल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्या अनुषंगाने पोलीस त्याचा तपास करत आहे, अशी माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी दिली आहे.

- Advertisement -

कुठे गेले दागिने?

दरम्यान, फकिराने सुनीतासमोरच मडक्यात दागिने ठेवले असूनही त्यातले दागिने गेले तरी कुठे? असा प्रश्न सुनीताला पडला होता. मात्र, ज्या वेळी या भोंदू फकिराने सुनीताकडून दागिने घेतले, तेव्हाच ते त्याने लपवले आणि मडक्यात दागिने ठेवल्याचा फक्त अभिनय केला. त्याच्या हातचलाखीमुळे सुनीताला दागिने मडक्यात नसून त्याच्या झोळीत गेल्याचं कळलंच नाही!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -