घरमुंबईबेस्ट बसचे पास क्लोनिंग करणारी टोळी गजाआड

बेस्ट बसचे पास क्लोनिंग करणारी टोळी गजाआड

Subscribe

आधीच तोट्यात चाललेल्या बेस्ट प्रशासनला आणखी तोट्यात आणणाऱ्या एका टोळीला चेंबूर पोलिसांनी अटक केली आहे.

आधीच तोट्यात चाललेल्या बेस्ट प्रशासनला आणखी तोट्यात आणणाऱ्या एका टोळीला चेंबूर पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी बेस्ट प्रवाशांच्या मासिक आणि वार्षिक (पास) कार्डचे क्लोनिंग करून प्रवाशांना गेल्या एक वर्षांपासून स्वस्त दरात विक्री करीत होती. या टोळीच्या कृत्यामुळे बेस्ट प्रशासनाला लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ ६ यांनी दिली. अटक करण्यात आलेल्यांपैकी मुख्य आरोपी हा बेस्टला कार्ड बनवून देणाऱ्या खाजगी कंपनीचा कर्मचारी असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला

पाशा शहाबुद्दीन शेख (२५), अर्जुन पटेल (४३), अनुराग तिवारी (२१), कुशाल पाटील (२३), अनिकेत जाधव (२६) असे अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. अनिकेत जाधव हा ट्रायमॅक्स कंपनीचा कर्मचारी आणि मुख्य आरोपी असून इतर तिघे एजंट म्हणून अनिकेतकडे काम करीत होती आणि पाशा हा प्रवासी आहे. २९ ऑक्टोबर रोजी पाशा हा दुपारी वाशीनाका ते कुर्ला पूर्व असा बेस्ट बसने प्रवास करीत होता, त्याच बसमध्ये असलेले बेस्टचे तिकीट तपासनीस यांनी पाशा जवळ असलेला बेस्टचा त्रैमासिक पास (कार्ड) चेंबूर नवजीवन सोसायटी या ठिकाणी तपासणीसाठी घेतले. मात्र त्यांना संशय येताच त्यांनी कुर्ला पूर्व बस आगार या ठिकाणी पाशा जवळचा त्रैमासिक पास आगारातील मशीनमध्ये तपासला असता मशीनमध्ये दुसऱ्याच प्रवाश्यांची माहिती आली. त्यांनी याबाबत पाशाकडे चौकशी केली असता त्याने हा पास वडाळा आगार येथून घेतला असल्याची माहिती दिली. काहीतरी गडबड असल्याची कुणकुण लागली. त्यांनी प्रवासी पाशाला घेऊन थेट चेंबूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाशाला ताब्यात घेतले.

- Advertisement -

टोळीतील चौघांना अटक केले

वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयप्रकाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एफ. के. मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जगताप, पोलीस अंमलदार विश्वास भोसले, विलास देसाई, प्रताप जाधव, नितीन साळवे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून मुख्य आरोपी अनिकेत जाधव याच्यासह चौघांना ताब्यात घेण्यात आले. यांच्याकडे कसून चौकशी केली असता अनिकेत हा ट्रायमॅक्स या कंपनीचा कर्मचारी असल्याचे समजले. ट्रायमॅक्स ही खाजगी कंपनी असून या कंपनीला बेस्ट प्रशासनाने प्रवाशांचे मासिक, त्रैमासिक तसेच वार्षिक पास बनवण्याचे कंत्राट दिले आहे. हे कंत्राट मागील अनेक वर्षांपासून या कंपनीकडे आहे. या कंपनीकडे नवी मुंबई महानगर परिवहन तसेच ठाणे परिवहन विभागाचे देखील कंत्राट आहे. या कंपनीला बेस्टने वडाळा बस आगारात जागा दिलेली असून त्या ठिकाणी प्रवाशांची माहिती घेऊन पास तयार करण्यात येतो. यावर पासधारकाचा नाव पत्ता आणि छायाचित्र लावून कार्ड रुपी हा पास देण्यात येतो.

अनिकेतने जबाबदारीचा गैरवापर केला

ट्रायमॅक्स या कंपनीने वडाळा येथील बेस्टची पास बनवण्याची जवाबदारी गेल्या वर्षभरापासून अनिकेत यांच्याकडे सोपवली होती. मात्र अनिकेत याने या जबाबदारीचा गैरवापर करून जुन्या बेस्ट प्रवाशांचा डाटा (वैयक्तीत माहिती) वापरून त्रैमासिक आणि वार्षिक पास तयार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याने ओळखीचे काही एजंट नेमले होते. या एजंटमार्फत तो संपूर्ण मुंबईभर बेस्टने प्रवास करण्यासाठी लागणारा ६ हजार रुपयांचा त्रैमासिक पास अर्ध्या किंमतीत बनवून देऊ लागला होता. यामध्ये एजंटला अर्धी रक्कम जात तर अनिकेत स्वतः अर्धी रक्कम ठेवत असे. असे त्याने वर्षभरात सुमारे ४०० पास कार्डची क्लोनिंग करून त्याची विक्री केली असल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले असल्याचे पोलीस उपायुक्त परिमंडळ ६ शहाजी उमाप यांनी दिली.

- Advertisement -

अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी हा ट्रायमॅक्स या खाजगी कंपनीचा कर्मचारी असून मागील वर्षभरात त्याने आपले एजंट नेमून त्या मार्फत त्याने सुमारे ४०० प्रवाश्यांना क्लोनिग केलेले पास विकले असुन त्यामुळे बेस्टला प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या मध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता असून तपास सुरू आहे.
– शहाजी उमाप, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ६

बेस्ट बस जनसंपर्क अधिकारी गोफणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बसच्या पासचे क्लोनिंग प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली, ही बाब आम्हाला पोलिसांकडून समजली असून याबाबत अधिक माहिती घेण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -