घरमुंबईबोगस पासपोर्ट आणि बोर्डिंग पासद्वारे मानवी तस्करी

बोगस पासपोर्ट आणि बोर्डिंग पासद्वारे मानवी तस्करी

Subscribe

एका फ्रान्स महिलेने श्रीलंकन महिलेची मानवी तस्करी करण्याच्या प्रयत्न केला. याप्रकरणी दोन विदेशी महिलांना अटक केली आहे.

बोगस कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट आणि बोर्डिंग पासद्वारे मानवी तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन विदेशी महिलांना सहार पोलिसांनी अटक केली असून त्या दोघीही फ्रान्सला जाण्यासाठी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्या होत्या. मिरा मिरव्हा हेलेना पसमा आणि कुहाप्रिया थेवारसा अशी या दोघींची नावे असून यातील मिरा ही फ्रान्स तर कुहाप्रिया श्रीलंकन नागरिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोन्ही महिलांना अटकेनंतर अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अरुलप्पा अ‍ॅन्थोनी मायकल आणि लॉरेन सरियाना या दोन एजंटला आरोपी दाखविण्यात आले आहे.

२८ जूनला मिरा आणि कुहाप्रिया हे दोघीही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्या होत्या. यावेळी मिराने कुहाप्रिया हिला विदेशात नेण्यासाठी तिचे फ्रान्स आणि फिनलंड देशाचे बोगस पासपोर्ट बनविले होते. तसेच बोगस इमिग्रेशन स्टॅम्प मारुन तिला पासपोर्टची अदलाबदली करुन विदेशात नेण्याची योजना बनविली होती. अशा प्रकारे मिराने मुंबई इमिग्रेशन अधिकार्‍यांची फसवणुक करुन श्रीलंकन महिलेची मानवी तस्करीचा प्रयत्न केला होता.

- Advertisement -

आरोपीने केली अधिकाऱ्यांची दिशाभूल

हा प्रकार विमानतळावरील अधिकार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी कुहाप्रियाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी तिने संबंधित अधिकार्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. कुहाप्रिया ही ३ ऑक्टोबर २०१८ रोजी श्रीलंका पासपोर्टवर भारतात आली होती. दिल्लीत वास्तव्यास असताना तिने अरुलप्पा या एजंटच्या मदतीने एक बोगस पासपोर्ट बनवून घेतला होता. तसेच तिला जर्मनी देशाचे नागरिकत्व मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी तिच्याकडून त्याने चौदा लाख रुपये घेतले होते.

पुस्तकात लपवून आणला फ्रान्सचा पासपोर्ट

दिल्लीनंतर ती इंडोनोनिया देशात गेली होती. तिथे तीन महिने काम करुन ती पुन्हा भारतात आली होती. चेन्नई येथे असताना अरुलप्पा या एजंटने तिला एक फ्रान्स महिला फ्रान्स देशाचा पासपोर्ट आणि बोर्डिंग पास देईल असे सांगितले. त्यामुळे ती २८ जूनला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. यावेळी तिने पुस्तकातून लपवून आणलेला फ्रान्स देशाचा पासपोर्ट आणि बोर्डिंग पास तिला दिले होते. याच पासपोर्टवर ती फ्रान्सला तर मिरा ही अहमदाबादला निघून गेली होती. मात्र कुहाप्रियाला ताब्यात घेतल्यानंतर अहमदाबाद विमानतळावर मिरा हिला संबंधित अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. बोगस पासपोर्ट आणि बोर्डिंग पासच्या मदतीने तिने कुहाप्रियाला विदेशात नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या दोघींनाही पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.

- Advertisement -

याप्रकरणी इमिग्रेशन अधिकारी जय किशन हरचंद्रराम यांच्या तक्रारीवरुन त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी ३७०, ४६५, ४६८, ४७१, ४१९, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर मिरा आणि कुहाप्रिया या दोघींना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्या दोघीही पोलीस कोठडीत असून मानवी तस्करी करणारी एक सराईत टोळी आहे. या टोळीने अशाच प्रकारे अन्य लोकांची मानव तस्करी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -