घरमुंबईठाण्यात एका होर्डिंगवरून आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा!

ठाण्यात एका होर्डिंगवरून आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा!

Subscribe

ठाण्यामध्ये एका अनधिकृत बॅनरवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जुंपली आहे.

ठाण्यातल्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील फुटपाथवर पडलेल्या होर्डिंगमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा सुरु झाला आहे. या होर्डिंगची उभारणीच सत्ताधाऱ्यांच्या फायद्याकरिता बेकायदेशीररित्या करण्यात आली असल्याचा आरोप करीत, ‘हे होर्डिंग उभारण्यासाठी ५ लाखांचा हफ्ता घेणारा खासदार कोण?’ असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित करून ठाण्यातील सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, यावर प्रतिआव्हान करत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘धोकादायक होर्डिंगसाठी पैसे घेणाऱ्या खासदाराचं नाव पुराव्यासहित जाहीर करावं, अन्यथा ज्यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला त्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणू’, असं जाहीर केलं आहे. ‘निवडणुकीच्या तोंडावर काही वादग्रस्त प्रकरणं काढून स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी हा खटाटोप असून सत्य बोलण्याची आणि पचवण्याची हिंमत असेल, तर त्या खासदाराचं नाव जाहीर करावं’, असंही आव्हान सरनाईक यांनी दिलं आहे.

‘..तर सुपाऱ्या घेणाऱ्या नेत्याची नावं जाहीर करू’

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धोकादायक होर्डिंगसाठी एका खासदारानं ५ लाख रुपये घेतल्याचा आरोप केला होता. हे धोकादायक होर्डिंग आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात येतं. त्यामुळं ‘कुठल्या खासदारानं या धोकादायक होर्डिंगसाठी पैसे घेतले? हा प्रश्न आपल्यालाही पडलेला आहे’, असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत. ‘शहरातील बऱ्याच अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंगमध्ये राष्ट्रवादीचा कुठला नेता भागीदार आहे? तसंच राष्ट्रवादीचा कुठला नेता अनधिकृत बांधकामांमध्ये सहभागी आहे? तसंच कुठला नेता शहरातील पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना बिल्डरांची सुपारी घेऊन बेकायदेशीर झाडं तोडतो? ती नावं आम्हांला जाहीर करावी लागतील’, असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

- Advertisement -

दरम्यान, मनसेने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘ठाण्यातील राजकीय नेते केवळ आरोप प्रत्यारोप करण्यात धन्यता मानत आहेत. फक्त अर्थकारण कोठे दडलेलं आहे त्याचा शोध घेत आहेत. ठामपाच्या भ्रष्टाचाराबाबत किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेविषयी मात्र कोणीही बोलत नाहीत. परंतु महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत काही राजकारणी लोक या भ्रष्टाचारात संगनमत करीत आहेत’, असा आरोप मनसेचे उपविभाग अध्यक्ष निखिल जाधव यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -