घरमुंबईपुण्यात झालं बाळाचं अपहरण, मुंबईत लागला छडा!

पुण्यात झालं बाळाचं अपहरण, मुंबईत लागला छडा!

Subscribe

पुणे रेल्वे स्थानकावरून एका चार महिन्याच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी अवघ्या पाच दिवसात बाळाची सुखरुप सुटका करण्यात यश आले आहे. पोलिसांच्या या दमदार कामगिरीमुळे बाळ सुखरुप आईच्या कुशीत विसावले आहे.

मुंबईतील ओशिवरा आणि आंबोली पोलिसांनी जबदरदस्त कामगिरी करून एका अपहरण करण्यात आलेल्या चार महिन्यांच्या बाळाची सुखरूप सुटका केली आहे. १७ ऑगस्ट २०१८ रोजी पुणे रेल्वे स्थानकातून चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. या अपहरण प्रकरणाचा छडा लावून पोलिसांनी बाळाला मातेकडे सोपवले असून आरोपी महिला मनीषा महेश काळे (२५) हिला ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

बकरी ईदनिमित्त बुधवारी मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तादरम्यान सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक दुधाड, हवालदार पवार, महिला पोलीस हवालदार गावनग हे पथक पोलीस मोबाईल व्हॅन मधून गस्त घालत होते. त्यावेळी त्यांच्याकडे वर्षा पवार (२०) ही महिला आली. या महिलेने सांगितले की, एका महिलेने पुणे रेल्वे स्थानकातून चार महिन्यांचे बाळ पळवले आहे. तसेच, एका महिलेच्या हातात बाळ असून त्या महिलेचे बाळ नसावे असा संशय आहे असेही सांगितले. सदर माहिती मिळताच मोबाईल व्हॅनमधील पोलीस पथकाने तात्काळ जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल येथे धाव घेऊन आरोपी महिलेला ताब्यात घेतले.

- Advertisement -

आरोपीनी दिली अपहरणाची कबुली

ओशिवरा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शर्मिला पाटील आणि मोटे यांनी आरोपी महिलेची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपी मनीषा हिने सांगितले कि, त्या बाळाच्या आईची नजर चुकवून चार महिन्यांच्या बाळाला पळवले. त्यानुसार उपनिरीक्षक पाटील आणि मोटे यांनी तात्काळ पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

याप्रकरणाची माहिती मिळातच पुणे लोहमार्ग पोलीस महिलेला घेऊन ताबडतोब मुंबईला येण्यास निघाले. कागदोपत्री पूर्तता करून सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार, पोलीस निरीक्षक कुरिल यांच्या मार्गदर्शनाखाली चार महिन्यांच्या बाळाला मातेच्या ताब्यात देण्यात आले, तर मनीषा काळे हिला पुणे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -