घरमुंबईनोकर्‍या सुटल्या, शाळेलाही दांड्या

नोकर्‍या सुटल्या, शाळेलाही दांड्या

Subscribe

माहुलवासीयांना बेस्ट संपाचा फटका

माहुलमधून कोठेही जायचे झाल्यास बेस्ट बसशिवाय कोणताही पर्याय नाही. त्यामुळे सलग आठवडाभर सुरू असलेल्या बेस्टच्या संपाचा सर्वाधिक फटका माहुलमधील प्रकल्पग्रस्तांना बसला आहे. बेस्टच्या संपामुळे कामावर, हॉस्पिटल किंवा शाळेत जाण्यासाठी बसगाडी उपलब्ध होत नसल्याने त्यांना रिक्षाने प्रवास करणे परवडणारे नाही. त्यामुळे माहुलमधील बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या शाळेला दांड्या झाल्या आहेत. अनेकांना नोकरीवर जाता आले नसल्याची प्रतिक्रिया माहुल प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे.

मुंबईमध्ये रस्ता रुंदीकरण व तानसा जलवाहिनी लगतच्या प्रकल्पग्रस्तांचे माहुलमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. माहुलमधील बहुतेक नागरिक झोपडपट्टीत राहणारे आहेत. त्यांचे पुनर्वसन माहुलमध्ये झाले असले तरी त्यांच्या शाळा आणि नोकर्‍या आधी ज्या ठिकाणी होत्या त्याच ठिकाणी आहेत. पुनर्वसन केलेल्या नागरिकांचे हातावर पोट असल्याने त्यांना रोज आपल्या जुन्या परिसरात जाऊन काम करून घर चालवावे लागत आहे. परंतु, माहुल हे चेंबूर व कुर्ला रेल्वेस्थानकापासून फारच दूर आहे. त्यामुळे माहुलमध्ये पुनर्वसन केलेल्या प्रकल्पग्रस्तांना बेस्ट बसशिवाय कोणताचा स्वस्त पर्याय उपलब्ध नाही. येथील नागरिकांना बेस्ट बसवर अवलंबून रहावे लागते. ज्या अंतरासाठी बेस्ट बसने २२ रुपये खर्च होतात, त्याच अंतरासाठी रिक्षाने १०० ते १५० रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे रिक्षाने नोकरी, हॉस्पिटल किंवा विद्यार्थ्यांना शाळेत जाणे परवडणारे नाही. माहुलमध्ये पुनर्वसन झालेल्या बहुसंख्य मुलांना शाळेला दांड्या माराव्या लागल्या असल्याची माहिती प्रकल्पग्रस्तांनी दिली. आठवडाभर शाळेला दांडी मारल्यावर सोमवारी मात्र परीक्षा असल्याने ३०० रुपये खर्च करून शाळेत जावे लागत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

- Advertisement -

आठवडाभर घरापासून दूर
बस बंद असल्याने धुणी भांडी करणार्‍या महिलांना रोजचा रिक्षाचा खर्च परवडत नसल्याने आपले काम सोडून घरी बसावे लागले आहे. माहुलमध्ये ये-जा करणे परवडत नसल्याने कित्येक लोक नोकरीच्या ठिकाणीच राहत आहेत. ते आठवडाभर घरीच आले नसल्याची माहिती प्रकल्पग्रस्तांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -