घरमुंबईमध्य रेल्वे स्थानकांवरील लिंबू सरबत, कालाखट्टा बंद

मध्य रेल्वे स्थानकांवरील लिंबू सरबत, कालाखट्टा बंद

Subscribe

कुर्ला स्थानकातील लिंबू सरबत बनविण्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अवघ्या मुंबईत एकच खळबळ उडाली होती. उसळलेल्या जनक्षोभानंतर झोपी गेलेल्या मध्य रेल्वेला जाग आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील फूड स्टाल्सवर मिळणार्‍या लिंबू सरबत आणि कालाखट्टावर बंदी घालण्यात आली आहे.

सध्या मुंबईत उन्हाळ्याच्या कडाक्याने अंगाची काहिली होत असल्याने मुंबईकर रेल्वे स्थानकातील लिंबू सरबताचा आधार घेतात. मात्र दोन दिवसांपूर्वी कुर्ल्यातील हार्बर मार्गावरच्या फलाट क्रमांक ७ व ८ वरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर अतिशय घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. स्टॉलच्या छतावर कॅण्टीनमधला कामगार घाणेरड्या पाण्यात लिंबू सरबत बनवत होता. त्याने सरबतामध्ये हातही धुतले. रेल्वे स्थानकावरील पुलाचे पत्रे काढलेले असल्याने एका प्रवाशाच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्या प्रवाशाने तत्परतेने त्याचा मोबाईलच्या कॅमेर्‍यात व्हिडिओ काढला.

- Advertisement -

त्याने याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करून व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर या प्रकाराबाबत समाज माध्यमावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मध्य रेल्वेने तात्काळ हा स्टॅाल बंद केला असून याबद्दल चौकशी सुरू केली आहे. सोबतच मध्य रेल्वेने आपल्या २४४ खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर मिळणारा लिंबू सरबत, कालाखट्टा,ऑरेंज जूसवर बंदी घातली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना लिंबू सरबत उपलब्ध होणार नाही. यासंबंधी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता यांनी बंदी घातल्याची माहिती खरी असल्याच सांगितले. मात्र यावर जास्त बोलण्यास नकार दिला.

प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणे थांबवा

- Advertisement -

उपनगरी रेल्वेतून प्रवास करणार्‍यांची संख्या 72 लाखांपेक्षा जास्त आहे. मुंबईतील गर्दीच्या स्थानकांवर दोन किंवा त्यापेक्षा जास्त खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. मात्र हे खाद्यपदार्थ विक्रेते अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसून सर्रास पदार्थ विकतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रवाशांच्या जागरुतेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग येते आणि कारवाईचे आदेश दिले जातात. मुळात रेल्वेमधील दक्षता विभाग आणि वाणिज्य विभागातील अधिकार्‍यांनी या बाबींवर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. मात्र अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. यामुळे दोषी स्टॉलधारकासह संबंधित रेल्वे अधिकार्‍यावर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणे थांबेल, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ता समीर झवेरी यांनी दिली आहे.

प्रवाशांना लिंबू सरबताची भीती
उन्हाळ्यात गर्दीने भरलेल्या लोकलमधून प्रवासात रेल्वे प्रवाशांच्या अंगातून घामाच्या धारा निथळतात. तेव्हा रेल्वे स्थानकांवर उतरताच रेल्वे प्रवासी लिंबू सरबत पितात. मात्र नुकतेच कुर्ल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर प्रवाशांच्या मनात रेल्वे स्टाल्सवरील लिंबू सरबताविषयी भीती निर्माण झाली आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -