घरमुंबईटीसी कार्यालयाला बनवले लॉजिग

टीसी कार्यालयाला बनवले लॉजिग

Subscribe

मुंबईत जरी पोटापाण्याचा प्रश्न मिटत असला तरी सर्वात मोठा प्रश्न निवार्‍याचा असतो. एका व्यक्तीकडे मुंबईत राहण्यासाठी हक्काचा निवारा नव्हता म्हणून तो चक्क टीसी असल्याचे सांगून सीएसएमटी रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीसांच्या विश्रामगृहात आराम करू लागला. मागील दीड महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. पण, हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नव्हता. अखेर एका टीसीने त्याच्याकडे ओळखपत्र दाखवण्याची मागणी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आणि त्याला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले.

कोकणातील सिंधुदुर्गमधून आरोपी अभिजित माधव राजाध्यक्ष हा दोन महिन्यांपूर्वी मुंबईत आला. मात्र, राहण्यासाठी उत्तम सोय नसल्याने तो हॉटेलमध्ये राहत होता. पण हातातले पैसे संपल्यानंतर, मात्र त्याने काहीतरी उपाय काढण्यासाठी म्हणून बनावट तिकीट तपासनीस बनण्याचे ठरवले.रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस म्हणून काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आराम करण्यासाठी विश्रामगृह असतात. याची त्याला कल्पना होती. म्हणून त्याने सीएसएमटी स्थानकात पांढर्‍या रंगाचा शर्ट घालून वावर सुरू केला. सगळ्या गोष्टींचा अंदाज आल्यानंतर त्याने वरच्या मजल्यावरच्या विश्रांतीगृहात प्रवेश मिळवला आणि तिथेच आपले बस्तान मांडले. दिवसभर काहीच काम नसल्याने इकडे तिकडे फिरून तो रात्री १० वाजता विश्रामगृहात यायचा आणि सकाळी साडेआठपर्यंत झोपत होता. तब्बल दीड महिना इतर तिकीट तपासनीस लोकांना त्याने मूर्ख बनवले होते.

- Advertisement -

सीएसएमटी रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस म्हणून काम करणारे एम.के. बुटान यांना आरोपी अभिजीत राजाध्यक्ष चार दिवसांपूर्वी बेडवर झोपताना दिसला.त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. मात्र, आरोपीकडे ओळखपत्र नसल्याने त्यानेे दाखवण्यास नकार दिला. इथेच त्याची फसगत झाली. त्यानंतर सीएसएमटी रेल्वे पोलिसांना पाचारण करून त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्यावर प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सीएसएमटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी दै. ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

रेल्वे स्थानकांतील विश्रामगृहांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. सलग दीड महिने एखादी व्यक्ती टीसींसाठी असलेल्या विश्राम-गृहामध्ये बेकायदेशीरपणे राहत असेल, तर प्रवाशांकरता असलेल्या विश्राम-गृहांचा विचारच न केलेला बरा, असे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -