घरमुंबईमहाजनांचे डाव यशस्वी, गोटे ठरले निष्प्रभ

महाजनांचे डाव यशस्वी, गोटे ठरले निष्प्रभ

Subscribe

सध्या २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. अशा वातावरणातच धुळे आणि नगर या दोन महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांकडे येणार्‍या लोकसभा-विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून बघितले गेल्याने या दोन्ही निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या होत्या. त्यात धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ७४ पैकी ५० जागा जिंकून आपले फिप्टी प्लसचे उद्दिष्ट साध्य करून दाखविले आहे.

या निवडणुकीत स्वतःच्याच पक्षाशी बंडखोरी करणार्‍या आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. भाजपला बहुमत असे या निवडणुकीचे अंतिम चित्र असले तरी हे चित्र रंगविणारे चित्रकार म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका निर्णायक ठरली.अंतर्गत संघर्ष आणि श्रेयवाद यामुळे या निवडणुकीला भाजप विरुद्ध आमदार गोटे असे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र या निवडणुकीत गिरीष महाजन यांनी खेळलेल्या सगळ्या चाली यशस्वी ठरल्या आणि एकेकाळी धुळ्याचे राजकारण ज्यांच्या भोवती केंद्रित होते त्या अनिल गोटेंना निवडणुकीच्या आखाड्यातून आणि धुळेकरांच्या मनातूनही खड्यासारखे उचलून बाजूला टाकण्यात ते यशस्वी ठरले.

- Advertisement -

काहीशा उशिराने का होईना, परंतु मनपा निवडणुकीची जबाबदारी नाशिक, जामनेर, जळगावच्या पालिका निवडणुका आणि पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत विजयाचे शिल्पकार ठरलेल्या गिरीश महाजन महाजन यांच्याकडे आल्यानंतर धुळ्यातील राजकीय हालचालींना खर्‍या अर्थाने वेग आला. तर पक्षाने आपल्याला डावलले याच्या रागात आमदार गोटे मुख्यमंत्र्यांसह भाजपतील महाजन, रावल आणि डॉ. भामरे यांच्यावर आग पाखडत राहिले.लोकसंग्रामची वेगळी चूल मांडून त्यांनी धुळ्यातील सर्व जागा लढविल्या. त्यांना मिले सूर मेरा तुम्हारा असे म्हणत शिवसेनेनेही साथ देऊन भाजपची कोंडी करण्याची चाल खेळली. मात्र महाजनांच्या सरस चाली पुढे त्यांची डाळ शिजली नाही आणि गोटेंसह शिवसेनेचेही मनसुबे निष्फळ ठरले.

भाजपने ५० जागांवर हक्क प्रस्थापित करून लोकप्रियतेत आपण आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. आपल्या चतुरस्त्र कौशल्याने गिरीश महाजन यांनी एका मागोमाग एक निवडणुकांमध्ये भाजपला एकहाती यश मिळवून दिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती किंवा त्यांच्या गळ्यातील ताईत ही उपाधी खरी असल्याचे सिद्ध करण्यात महाजन पुन्हा एकदा यशस्वी ठरले आहेत.गोटे यांचा एककल्ली कारभार नजरेआड करून महाजनांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली होती. धुळ्याची जबाबदारी सांभाळल्यानंतर सुरुवातीला त्यांनी गोटेंना साफ दुर्लक्षित केले. तर त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी डॉ.भामरे यांना समोर उभे केले. दुसरीकडे डॉ. सुभाष भामरे, जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांची मोट बांधून त्यांच्या मदतीने इतर पक्षातील उमेदवारांना आपल्या जाळ्यात ओढले.प्रचारासाठी प्रसारमाध्यमांचा तर अन्य कामांसाठी प्रशासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि साम-दाम-दंड-भेद या कुटनीतीचा प्रभावी वापर करून सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न यशस्वी करून दाखवले. मनपा निवडणुकीच्या प्रचाराला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाचारण करून त्यांचा मोजक्या प्रतिष्ठीत नागरिकांशी संवादही घडवून आणला.

- Advertisement -
गोटे यांचे काय चुकले

सत्तासुंदरीच्या मोहात पडलेल्या ७१ वर्षीय अनिल गोटे यांना या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा धुळ्याचे अनभिषिक्त सम्राट होण्याचे कडक डोहाळे लागले त्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली होती. मात्र ते करीत असताना त्यांनी केलेला आततायीपणा धुळेवासीयांच्या पचनी पडला नाही. स्वतःचे पूर्व कर्तृत्व आणि जनमानसातील प्रतिमा यांचा त्यांनाच विसर पडला आणि भाजपवर शब्दसंधान करताना त्यांनी केलेले शब्दप्रयोगही धुळेकरांना रुचले नाहीत. त्याचप्रमाणे सत्तेसाठी, राजकीय हाडवैरी असलेल्या राष्ट्रवादीच्या राजवर्धन कदमबांडे यांच्याशी केलेली हातमिळवणी…, ज्या सेनेची ‘राष्ट्रवादी सेना’ म्हणून हेटाळणी केली त्याच शिवसेनेच्या पाच उमेदवारांना दिलेला पाठिंबा…., लोकसंग्रामच्या १३ उमदेवारांना पाठींबा मिळावा म्हणून त्यांच्यापुढे घातलेले लोटांगण…,या प्रकारांनी गोटे यांनी स्वतःची विश्वासार्हता गमावली होती. परिणामस्वरूप गोटे यांना धुळेकरांनी महापालिकेचा बाहेरचा रस्ता दाखवला.

राष्ट्रवादीला भोवला असंगाशी संग

या निवडणुकीत असंगाशी संग केल्याने सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या हातून महापालिका गमावण्याची वेळ आली. इथेही महाजनांची चाल यशस्वी झाली व ऐनवेळी मातब्बर २० नगरसेवकांना भाजपामध्ये खेचत त्यांनी कदमबांडे यांच्या तोंडचे पाणी पळविले. त्यामुळे निश्चिंत असलेल्या कदमबांडे यांना आयत्यावेळी धावाधाव करावी लागली.राष्ट्रवादी व काँग्रेसने आघाडी करून समर्थ आव्हान उभे करण्याचा केलेला प्रयत्न भाजप आणि गोटे यांच्यातील मतभेदांमुळे निष्फळ ठरला. तर राष्ट्रवादीकडून गोटेंशी करण्यात आलेल्या हातमिळवणीच्या प्रयत्नांची जबर किंमत राष्ट्रवादीला पराभवाच्या रूपाने चुकवावी लागली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -