घरदेश-विदेशभाजपमध्ये मेगाभरती नंतर आता मेगागळती?

भाजपमध्ये मेगाभरती नंतर आता मेगागळती?

Subscribe

अबकी बार २२० पार चा नारा देत मेगाभरती केलेल्या भाजपला आता मेगाभरतीचा सामना करावा लागू शकतो.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत शिवसेनेने भाजपला धक्का दिला. त्यानंतर आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. नव्या सरकारला आठवडा होत नाही तोच भाजपला चिंतेत टाकणारे आणखी एक वृत्त हातात येते. ते म्हणजे मेगागळतीचे. भाजपमधील काही आमदार आणि एक विद्यमान खासदार पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अबकी बार २२० पार चा नारा देत मेगाभरती केलेल्या भाजपला आता मेगाभरतीचा सामना करावा लागू शकतो.

भाजपचे आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात?

विधानसभा निवडणूक २०१९ पूर्वी अबकी बार २२० पार चा नारा देत भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून ‘मेगाभरती’ केली. या मेगाभरती अंतर्गत भाजपमध्ये दाखल झालेले आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटातून मिळाली आहे.

- Advertisement -

पक्षांतराचे टायमिंग चुकले?

महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्याने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण असताना भाजपच्या गोटात मात्र काही आमदार अस्वस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने केलेल्या मेगाभरतीतील काही जण पुन्हा पक्षांतराच्या मार्गावर असल्याचे कळते. पक्ष बदलण्याचे टायमिंग चुकल्याची खंत बाळगत सत्ताधारी तिन्ही पक्षनेत्यांच्या संमतीची प्रतीक्षा हे मेगाभरतीतील नाराज करत आहेत. भाजपच्या या आमदारांमध्ये मराठवाड्यातील ३, पश्चिम महाराष्ट्रातील पाच आमदारांचा समावेश असून आणखी चार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या आमदारांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

पक्षांतरासाठी ही अट

मेगाभरतीतील नाराजांना पुन्हा पक्षांतर करण्यासाठी अटीचे बंधन आहे. त्यानुसार ज्या विधानसभा मतदारसंघांमधून भाजपचे संबंधित आमदार निवडून आले त्यांना त्या-त्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षात परतण्याची पूर्वअट स्वीकारावी लागणार आहे. त्यानुसार काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेला एक आमदार आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छित आहे. पण अटीनुसार त्याला काँग्रेसमध्येच प्रवेश करावा लागणार आहे. नागपूर येथे होऊ घातलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर त्यांच्या प्रस्तावावर विचार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

अधिवेशनानंतर निर्णय

दरम्यान भाजपमध्ये नाराज असलेले तसेच पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांचा प्रभाव असलेले ४ आमदार शिवसेनेच्या संपर्कात असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ७ विजयी आमदारसुद्धा सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानंतर पक्षांतराचे ऑपरेशन राबविण्याचा सत्ताधारी तिन्ही पक्षांचा विचार असल्याची माहिती मिळते.

राज्यसभा खासदारही नाराज

राज्यातील सत्तांतराचे पडसाद राज्यसभेतही उमटल्याचे कळते. कारण राज्यातील नाट्यमय सत्तांतरानंतर भाजपमध्ये नाराज झालेला राज्यसभेतील एक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याची तयारी दर्शवली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सांगतील तेव्हा राजीनामा देऊन पक्षप्रवेश करण्याची या राज्यसभा सदस्याची तयारी असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -