घरमुंबईमयताच्या टाळूवरचे लोणी खाणारा अटकेत

मयताच्या टाळूवरचे लोणी खाणारा अटकेत

Subscribe

सहा महिन्यांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या बँक खात्यातून एटीएमद्वारे १० लाख रुपयांची रोकड काढणार्‍या एकाला गोवंडी पोलिसांनी अटक केली आहे.

सहा महिन्यांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या बँक खात्यातून एटीएमद्वारे १० लाख रुपयांची रोकड काढणार्‍या एकाला गोवंडी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने मृत इसमाचे डेबिड कार्ड आणि एटीएम कार्डची चोरी करून १५ दिवसात ही रक्कम काढली, अशी माहिती गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.
राल्फ उर्फ फिलिप्स रेमंड कुटीनो (५७)असे मृत इसमाचे नाव आहे. राल्फ हे मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन म्हणून नोकरी करीत होते. अविवाहित असलेले राल्फ हे गोवंडीतील सायन ट्रोम्बे रोडवरील निर्मलगंगा को.ऑप. हाऊसिंग सोसायटी या उच्चभ्रू वसाहतीत एकटेच राहत होते. राल्फ यांचा एक भाऊ रिचल्ड हा कुर्ला पूर्व, नेहरु नगर आणि दुसरा भाऊ रोनाल्ड कुटीनो हा कॅनडा येथे राहतो. २ जून रोजी राल्फ हे राहत्या घरात मृतावस्थेत आढळले होते. त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत गोवंडी पोलिसांनी ताब्यात घेतला होता. राल्फ यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला होता, असे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले होते. भावाच्या मृत्यूची माहिती कळताच कॅनडात असलेला त्यांचा भाऊ तसेच कुर्ला पूर्व येथील मोठा भावाने मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, कुर्ला या ठिकाणी राहणार्‍या भावाने मृत भावाच्या घराच्या साफसफाईसाठी कुर्ला पूर्व येथून चार ओळखीच्या इसमांना आणले होते. ५ जून रोजी त्यांनी घराची साफसफाई केली.
दरम्यान, ६ जून ते २३ जूनच्या दरम्यान मृत राल्फ यांच्या दोन बँक खात्यांवरून वेगवेगळ्या एटीएममधून १०लाख रुपये काढण्यात आले असल्याचा प्रकार जुलै महिन्यात कॅनडातील भावाच्या लक्षात आला. भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यातून पैसे कोणी काढले म्हणून रोनाल्डो या भावाने बँकेत चौकशी केली. त्यानंतर रोनाल्डो यांनी गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी या अर्जाचा तपास करून गुन्हा दाखल करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात याना सांगितले. खरात यांनी इमारतीचा सीसीटीव्ही तसेच इमारतीच्या गेटवरील डायरी तपासली असता राल्फ यांच्या घरी ५ जून रोजी राल्फ यांच्या भावासोबत साफसफाईसाठी आलेल्या ४ जणावर संशय आला. डिसेंबर महिन्यात पोलिसांनी गुन्हा दाखल करून आळीपाळीने ४ ही जणांना चौकशीसाठी बोलावले. त्यापैकी रेहान इस्माईल मेमन (३९)याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
रेहान हा कुर्ला नेहरू नगरमध्ये राहणार असून त्याचा हॉटेलचा व्यवसाय होता, मात्र हॉटेलच्या व्यवसायात त्याला तोटा झाल्यामुळे त्याने वर्षभरापूर्वीच हॉटेल बंद केले होते. हॉटेल बंद झाल्यानंतर पैशाची चणचण भासू लागल्यामुळे तो लहानसहान कामे करू लागला होता. दरम्यान, ५ जून रोजी रेहान हा इतर तिघांसोबत राल्फ यांच्या घराची साफसफाई करण्यासाठी गेला असता त्याने घरातून राल्फ यांची दोन बँक डेबिट कार्ड आणि एटीएम कार्ड तसेच मोबाईल फोन चोरी केले. त्यानंतर रेहान याने ६ जून ते २३ जूनच्या दरम्यान वेगवेगळ्या एटीएममधून राल्फ यांच्या खात्यातून १० लाख रुपये काढले. रेहान याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात त्याचे आणखी सहकारी सहभागी असण्याची शक्यता आहे.  त्या  अनुषंगाने  तपास सुरू आहे. 
शशिकांत माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -