घरमुंबईम्हाडाचे मुंबईत वर्किंग वुमन हॉस्टेल

म्हाडाचे मुंबईत वर्किंग वुमन हॉस्टेल

Subscribe

म्हाडाकडून आतापर्यंत सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात आले आहे. पण म्हाडाच्या इतिहासात मुंंबईत वर्किंग वुमन हॉस्टेल हे लवकरच उभारण्यात येणार आहे. म्हाडाचे मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी मंगळवारी याविषयी माहिती दिली. मुंबईतील नोकरदार महिलांची मागणी पाहता म्हाडाकडून मोतीलाल नगर पुनर्वसन प्रकल्पात हे वर्कींग वुमन हॉस्टेल उभारण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

वर्कींग वुमन हॉस्टेलसोबतच वृद्धाश्रम, बालसुधारगृह तसेच २ मिनी हॉस्पिटलचाही समावेश या प्रकल्पाअंतर्गत असणार आहे. एकूण १४० एकरावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एका छोट्या शहरासारखाच हा पुनर्वसन प्रकल्प उभारण्यात येईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मोतीलाल नगरच्या निमित्ताने मंगळवारी झालेल्या बैठकीत नव्याने तयार करण्यात आलेल्या आराखड्याबाबत चव्हाण यांनी माहिती दिली. म्हाडा मोतीलाल नगर पुनर्वसन करण्यासाठी स्वतः पैसे गुंतवणार आहे.

- Advertisement -

म्हाडा स्वतः या प्रकल्पाचे पुनर्वसन करेल किंवा संयुक्तिकपणे या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या निमित्ताने पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून याबाबतच्या परवानग्या येत्या दोन महिन्यात मिळतील असे अपेक्षित आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात या प्रकल्पाच्या पायाभरणीचे काम सुरू होईल.

या प्रकल्पाची प्रक्रिया आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधीच सुरू होणार आहे. त्यामुळेच विधानसभेच्या आचारसंहितेचा यासाठी कोणताही परिणाम होणार नाही असे ते म्हणाले. वर्कींग वुमन हॉस्टेल हे किती क्षमतेचे असेल आणि काय सुविधा उपलब्ध असतील याबाबतचा सविस्तर प्लॅन येत्या काही दिवसांमध्ये तयार करण्यात येईल. मुंबईत अनेक भागातून महिला कामासाठी येतात. पण मुंबईतील घराचे भाडे देऊन हाती काहीच उरत नाही. त्यामुळेच मुंबईतील महिलांनी केलेल्या मागणीनुसार म्हाडाकडून पहिल्यांदाच अशा पद्धतीचे वर्कींग वुमन हॉस्टेल उभारण्यात येणार आहे.

- Advertisement -

वर्कींग वुमन हॉस्टेल, वृद्धाश्रम आणि बालसुधार गृहासाठी सामाजिक संस्थेला याचे व्यवस्थापन करण्याचे काम देण्याचा म्हाडा विचार करत आहे. म्हाडाकडून मोतीलाल प्रकल्पाअंतर्गत १८ हजार परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. एखाद्या छोट्या शहरासारखाच मोतीलाल नगरचा विकास होईल, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -